पुणे - पुणे शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची संततधार सुरू आहे. पुढील चार दिवस शहरात अशीच स्थिती राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह शहराला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोथरूड, सिंहगड रस्ता, हडपसर, विश्रांतवाडी, औंध, वडगाव शेरी आणि बाणेर परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. गुरुवारीही (ता. १५) सकाळपासून आकाश ढगाळ होते आणि दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
काही भागांत हलक्या स्वरूपाचा, तर काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्वमोसमी पावसामुळे शहराच्या कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. परिणामी, गारवा निर्माण झाला असून, उकाड्यात दिलासा मिळाला.
शहरात गुरुवारी ३५.६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविले गेले, तर २३.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. पुढील चार दिवसांत कमाल तापमानात आणखी घट होऊन कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे.
तर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. पुणे आणि परिसरात शुक्रवारी (ता. १६) कमाल तापमानात किंचित घट होणार असून, कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जाईल, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता वर्तविली आहे.
राज्यात पाच दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता
राज्यभरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला पूर्वमोसमी पावसाची शक्यता वाढली असून, राज्याच्या चारही उपविभागांमध्ये पुढील पाच ते सहा दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवसांत राज्यातील काही भागांत कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही, तर पुढील चार ते पाच दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागांत हळूहळू एक ते दोन अंश सेल्सिअस घट होणार असून, त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
नैर्ऋत्य मॉन्सून गुरुवारी (ता. १५) अग्नेय अरबी समुद्राच्या काही भागात, मालदीव आणि दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात, अंदमान बेटे आणि अंदमान समुद्रात आणखी पुढे सरकला आहे.
पुढील तीन ते चार दिवसांत नैर्ऋत्य मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी दक्षिण अरबी समुद्र, मालदीव क्षेत्राच्या काही भागांत, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटे, अंदमान समुद्राच्या उर्वरित भागांत आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत परिस्थिती अनुकूल आहे.
तर कोकण आणि आसपासच्या परिसरात असलेली चक्रीय स्थिती आता उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि आसपासच्या भागांत समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध विभागांमध्ये पुढील पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता आहे, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
कोकण गोवा आणि मुंबईत पालघरवगळता उर्वरित जिल्हे यासह मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत तर मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.