फैय्याज शेख
बीड : अनेक वर्षांपासून गावात सुविधा नाहीत. मुख्य म्हणजे देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून गावाला पक्का डांबरी रस्त्या झालेला नाही. तर बस सेवेची देखील समस्या आहे. या सर्व परिस्थितीला तोंड देत वनवेवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून या ग्रामस्थांनी आख्ख गावच विक्रीला काढले आहे. इतकेच नाही तर गावात जाणाऱ्या रस्त्यातील खड्ड्यांचे वर्षश्राद्ध घालून आंदोलन देखील केले आहे.
जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वनवेवाडी या गावाची हि गोष्ट आहे. वनवेवाडी या गावच्या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून या गावाने डांबरी रस्ताच पाहिला नाही. डांबरी रस्ता नसल्याने वनवेवाडी गावातील नागरीकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. तर येथील विद्यार्थींना देखील रस्त्यांनी पायी चालणे मुश्किल होत आहे, अद्याप पाउस सुरू नसतांना रस्त्यांची अशी अवस्था असून पावसाळ्यात हि परिस्थिती अधिक बिकट होत असते.
बससेवाही दुरापास्त
गावातील वयोवृद्ध नागरिकांना किंवा अत्यावश्यक सेवेकरिता दवाखान्यात नेण्यासाठी कोणती ही रुग्णवाहिका देखील गावात येत नाही. तसेच गावात अद्याप पर्यंत बससेवा देखील सुरु झालेली नाही. केवळ मतदान पेट्यासाठीच गावात येते. तर या गावात कोणत्याच मोबाईलची रेंज नाही, या गावाशी कोणाचा संपर्क होत नाही. झाडावर चढून जिव धोक्यात घालून मोबाईल रेंजचा शोध घ्यावा लागत आहे.
ग्रामस्थांनी घातले खड्ड्यांचे श्राद्ध
या सर्व समस्यांना त्रस्त ग्रामस्थांनी गावात आज आंदोलन केले आहे. गावच्या रस्त्यावरील खड्ड्यांचे श्राध्द घालून कितेक वर्षापासून असलेल्या या खड्ड्यांवर पुष्पवृष्टी करत बोंबल्या आंदोलन ग्रामस्थांनी केले आहे. तर यावेळी फडणवीस सरकारने आमच गाव विकत घ्यावे नाहीतर रस्ता द्यावा आशी अजब मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यामुळे आता तरी सरकार हा रस्ता बनवील का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.