निकाल पाहण्यासाठी गेलेली विद्यार्थिंनी बेपत्ता
esakal May 16, 2025 12:45 AM

निकाल पाहण्यासाठी गेलेली विद्यार्थिनी बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे,ता. १५ : दहावीचा निकाल पाहण्यासाठी गेलेली १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या पालकांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
घोडबंदर रोड येथे राहणारी १७ वर्षीय मुलगी मंगळवारी (ता. १३) सकाळी एकटीच साडेअकराच्या सुमारास लोकमान्य नगर येथील शाळेत दहावीचा निकाल पाहण्यासाठी गेली होती. दरम्यान, तिच्या पालकांनी तिच्या मोबाईल फोनवर कॉल केल्यावर मोबाईल फोन बंद लागत असल्याने पालकांनी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे विचारपूस केली. तसेच शाळेत जाऊन चौकशीही केली, पण तिची काही माहिती मिळाली नाही. तसेच ती घरीही आली नाही. म्हणून नातेवाइकांकडे विचारपूस केली, पण काही समजू शकले नाही. याचदरम्यान तिचा ऑनलाइन निकाल तपासला असता, ती नापास झाल्याचे समजले. असे तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास कासारवडवली पोलिस करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.