चोरट्यांना बँक खाती
पुरवणारी टोळी अटकेत
मुंबई, ता. १४ ः राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’च्या नावे शहरातील झोपडपट्ट्यांमधील अशिक्षित महिलांची बँक खाती उघडून, ती सायबर चोरट्यांना विकणाऱ्या टोळीस जुहू पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेल्या वर्षभरात या टोळीने शहरातील विविध वस्त्यांमधून सुमारे अडीच ते तीन हजार व्यक्तींची बँक खाती उघडून ती विकल्याचा संशय पोलिसांना आहे.
अविनाश कांबळे, फाल्गुनी जोशी आणि श्रुती राऊत अशी अटक आरोपींची नावे आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार गुजरातचा रहिवासी असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळवून देऊ, असे प्रलोभन दाखवत या टोळीने बँक खाती उघडली आणि सुरुवातीला खातेदार महिलांना एक ते दीड हजार रुपये दिले. पुढील हप्ता सरकारकडून थेट खात्यात जमा होईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. एका बँक खात्यामागे या टोळीला चार ते ३० हजार रुपये मिळत होते.
दरम्यान, यापूर्वी मानखुर्द परिसरात लाडकी बहीण योजनेच्या नावे तब्बल ६५ महिलांची बँक खाती उघडून, त्याआधारे २० लाखांचे आयफोन कर्जावर घेत त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती.