Pune : पुण्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
esakal May 15, 2025 04:45 PM

भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर तणाव वाढला होता. शस्त्रसंधीमुळे तणाव कमी झाला असला तरी पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशतवादी संघटनांकडून संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेता पुणे पोलिसांनी सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुणे शहरात १२ जून २०२५ पर्यंत काही हवाई उपकरणांच्या वापरावर बंदी घातली आहे. यात ड्रोन, रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट, मायकोलाइट विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हॅण्डग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादी उपकरणांचा समावेश आहे. पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ही बंदी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानने अलीकडेच जम्मू, राजस्थान आणि पंजाब सीमांवर आक्रमक पावले उचलली होती. त्यानंतर भारतानेही लाहोर, कराची आणि इस्लामाबादमध्ये ड्रोनद्वारे लक्ष्य करून जोरदार प्रत्युत्तर दिलं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

मुंबईतही पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान काही ठिकाणी ब्लॅकआउटचीही अंमलबजावणी करण्यात आली होती. या सर्व घडामोडींचा विचार करता, पुण्यासह मुंबईत हल्ल्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली तर तात्काळ पोलिसांना सांगा असं आवाहन केलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.