“आमदार फुटले, गद्दार झाले. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणाच्या हातात दिली? तर एका लोफर माणसाच्या हाती दिली,” असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र संताप व्यक्त केला. तुम्ही एकनाश शिंदेंना शिवसेनेचे मालक कसे बनवू शकता, तुम्ही कोण आहात? असा सवाल त्यांनी भाजपला केला. राऊतांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं शनिवारी प्रकाशन समारंभ पार पडणार आहे. या पुस्तकात त्यांनी बरेच खळबळजनक खुलासे केले आहेत. यात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कशाप्रकारे मदत केली होती, याचाही संदर्भ दिला आहे. याविषयी बोलताना ते भाजपला उद्देशून म्हणाले, “ठाकरे कुटुंबाने, मातोश्रीने त्यांच्यावर एवढे उपकार केले. त्यांनी आमचा पक्ष फोडला याचं काही वाटत नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफरच्या हातात दिला.”
“ज्या बाळासाहेबांनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले. हे त्यांना शोभलं नाही. त्यामुळे चिडून मी लहानसा संदर्भ दिला. मी या विषयावर कधी बोललो नाही. लिहिलं नाही. उद्धव ठाकरेही कधी बोलले नाही. काही गोष्ट गोपनीय असतात. आम्ही कधीच बोललो नाही. या कानाचं त्या कानाला कधी गेलं नाही. पण त्या ओघात हा प्रसंग लिहिला,” असं राऊत पुढे म्हणाले. नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी आरोपी होते. तसंच अमित शाह हे एका खूनप्रकरणी आरोपी होते, त्यावेळेस युपीएचं सरकार होतं. मोदींना दंगलीप्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती. शरद पवारांमुळे त्यावेळी मोदींची होणारी अटक टळली, असा दावा राऊतांनी त्यांच्या पुस्तकात केला. त्याचप्रमाणे एका खून प्रकरणात बाळासाहेबांनी अमित शाह यांची कायद्याच्या चौकटीबाहेर मदत केल्याचाही खुलासा त्यांनी केला.
“संजय राऊतांना सनसनाटी पसरवण्यासाठी पुस्तक लिहावं लागत नाही. कोण बोलतं हे सनसनाटी पसरवण्यासाठी लिहिलं गेलंय. बोलणारे तेव्हा होते का? हे पुस्तक संपूर्ण सत्य आहे. ही कादंबरी नाही. हे मनघडंत कहाण्या मोदी वगैरे सांगतात ना, तशा त्या कल्पोकल्पित मनोहर कहाण्या नाहीत. या सत्यकथा आहे. ही सत्यकथा आहे,” असा दावा राऊतांनी केला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या पुस्तकावर बंदी आणण्याची भिती वाटत नसल्याचंही स्पष्ट केलं.