Sanjay Raut claims that if anything else had been written in book there would have been an uproar
Marathi May 16, 2025 02:24 PM


मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे शनिवारी (ता. 17 मे) उद्घाटन होणार आहे. परंतु, त्याआधीच या पुस्तकात लिहिलेले काही मजकूर आता प्रसार माध्यमांच्या हाती लागलेले आहेत. एका खून प्रकरणात तडीपार असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली होती, ज्यामुळे आज त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत, असा दावा या पुस्तकाच्या माध्यमातून राऊतांनी केला आहे. परंतु, यापेक्षा अजूनही बऱ्याच गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत, त्या जर का मी लिहिल्या असत्या, तर हाहाकार माजला असता, पण मी मर्यादा पाळल्या आहेत, असे म्हणत राऊतांना आणखी काय खुलासे करायचे होते, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Sanjay Raut claims that if anything else had been written in book there would have been an uproar)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 16 मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात लिहिलेल्या अमित शहांच्या आठवणींबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत ते म्हणाले की, पुस्तकात जे लिहीले, मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. नरकातला स्वर्ग हे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे. मला ज्या पद्धतीने तुरुंगात पाठवले, 100 दिवसांपेक्षा जास्त काळ मी तुरूंगात राहिलो, हे तिथले अनुभव आहेत. ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापोटी तुरूंगात पाठवले, त्यांच्याच अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी कशी मदत केली, त्या गोष्टी तुरूंगात मला आठवल्या, त्यापैकी अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. गेल्या अनेक वर्षांत मी बऱ्याच गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर पाहिल्यात, ऐकल्या आणि अनुभवल्यादेखील. त्याचे पुस्तक लिहा, असे मला अनेक वेळा सांगण्यात आले, अशी माहिती यावेळी राऊतांनी दिली.

हेही वाचा… Sofia Qureshi : सुप्रीम कोर्टाचे कडक ताशेरे म्हणजे भाजपाच्या इभ्रतीचा जाहीर पंचनामाच, ठाकरेंचा घणाघात

तर, ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांसोबत राहून आपण केल्या आहेत, ते सीक्रेट मिशन, त्याबद्दल पुस्तकातून लिहीणs, लोकांसमोर आणणे हे नैतिकतेला धरून नाही. काही गोष्टी या गोपनीय असल्याच पाहिजेत. मी फक्त संदर्भ दिला. गेल्या 30-35 वर्षांत काय घडले होते आणि काय घडत आहे. त्याच्याविषयी अनेक घटना माझ्याकडे आहेत. मी एकच संदर्भ दिला की शरद पवार असो किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, राजकारण न पाहता मदत करण्याचा महाराष्ट्रातील या 2 प्रमुख नेत्यांचा स्वभाव आहे. पण त्यांनी केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले, माणसे कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी अट्टाहास कसा केला हे सगळं मी पुस्तकात मांडले आहे. एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला दिसला. उपकाराची फेड अपकाराने कशी केली, हे त्यातून मी मांडण्याचा प्रयत्न केला, असा टोला राऊतांनी लगावला.

…तर हाहाकार माजला असता

मी पुस्तकात लिहीलेल्या दोन्ही घटना 100 टक्के सत्य आहेत. मी त्यापेक्षाही जास्त लिहू शकलो असतो, पण त्याने फार हाहाकार माजला असता. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्याने मी मर्यादा पाळल्या आणि संयम पाळला आहे. यापेक्षा असंख्य घटनांचा मी साक्षीदार आहे. तुम्हा सर्वांना हे नाकारता येणार नाही, मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांसोबत राहिलेला माणूस आहे. त्यामुळे मोदी-शहा यांना अनेकवेळा बाळासाहेबांनी केलेली मदत आणि घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे. पण मी त्या कधीच लिहिणार नाही. नरकातला स्वर्ग वेगळा प्रवास आहे. तुरुंग आहे. जेव्हा आपण तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो, राज ठाकरेंच्या भाषेत एकांतात जेव्हा आपण तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो, तेव्हा अनेक गोष्टी तुरुंगातील भिंतीशी बोलताना जुने संदर्भ आठवतात. त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो. घाबरून पळून जावे लागत नाही, अशी खरमरीत टीका राऊतांनी केली आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.