TRF : 'टीआरएफ'विरोधात मोर्चेबांधणी; आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न
esakal May 16, 2025 02:45 PM

न्यूयॉर्क : पहलगाम हल्ल्याचा सूड उगविल्यानंतर भारताने आता या हल्ल्याला जबाबदार असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेला संयुक्त राष्ट्रांनी ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कार्यालय आणि यासंबंधीच्या कार्यकारी समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) ही पाकस्थित लष्करे तैयबाचीच संलग्न संघटना आहे. या संघटनेने मागील वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये बऱ्याच कारवाया केल्या आहेत.

पहलगाममध्ये दहतवादी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या करण्यातही याच संघटनेचा हात आहे. त्यामुळे या संघटनेला जगाच्या नजरेसमोर आणत त्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. भारतीय शिष्टमंडळाने आज संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीच्या देखरेख पथकाचीही भेट घेतली.

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘टीआरएफ’ या संघटनेने स्वत:हून स्वीकारली होती. तरीही संयुक्त राष्ट्रांनी हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध करताना ‘टीआरएफ’चे नाव घेणे टाळले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी ही बाब संयुक्त राष्ट्रांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते.

संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादाविरोधात अनेक ठराव मंजूर केले असून त्यानुसारच ‘टीआरएफ’ला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी भारताचे प्रयत्न असल्याचे समजते. याशिवाय, सायबर सुरक्षा, दहशतवाद्यांच्या प्रवासावर निर्बंध, दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे आणि दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखणे या मुद्द्यांवरही भारतीय शिष्टमंडळाने चर्चा केल्याचे समजते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.