पिंपरी : रिक्षाने मोटारीला धडक दिली. त्यामुळे मोटारचालक खाली उतरून पाहणी करत असताना रिक्षातील तिघांनी मोटार चालकाच्या तोंडावर मिरची पूड टाकून बेदम मारहाण केली. ही घटना भोसरी येथे घडली. निखिल नंदकुमार शेटे (वय ३६, रा. भोसरी) असे मारहाण झालेल्या मोटार चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी निखिल हे त्यांच्या मोटारीतून जात होते. ते भोसरीतील श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसमोर आल्यानंतर त्यांच्या मोटारीला एका रिक्षाने पाठीमागून धडक दिली. यामध्ये मोटारीचे नुकसान झाले. त्यामुळे ते मोटारीची पाहणी करण्यासाठी खाली उतरले असता रिक्षातील तिघांनी निखिल यांच्या तोंडावर मिरची पूड टाकून स्टीलच्या रॉडने तसेच धारदार हत्यारांनी मारून गंभीर जखमी केले. त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील सद्गुरुनगर येथे घडली. शेखर पोपट जगताप (वय २०, रा. केंदूर, ता. शिरूर, पुणे) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोपट विठ्ठल जगताप यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहन मारुती खटिंग (वय २१, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचा मुलगा शेखर जगताप हे त्यांच्या दुचाकीवरून सद्गुरुनगर भोसरी येथून जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या मोटारीने शेखर यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात शेखर गंभीर जखमी झाले.
दारू विक्रीप्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी : बेकायदारित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेवर बावधन पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला. ही कारवाई बावधन येथे करण्यात आली. बावधन येथील ४० वर्षीय महिला एका हॉटेलच्या पाठीमागे बेकायदारित्या दारू विक्री करत असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोन लाख ६५ हजार रुपये किमतीचे पाच हजार लीटर दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि १५० लीटर तयार गावठी दारू हा मुद्देमाल जप्त केला.
---