मुंबई : आयटी शेअर्समध्ये विक्री झाल्यामुळे आज शुक्रवार १६ मे रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. मात्र स्मॉलकॅप-मिडकॅप शेअर्समध्ये सलग पाचव्या दिवशी वाढ दिसून आली. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक १.१८ टक्क्यांनी आणि मिडकॅप निर्देशांक ०.८५ टक्क्यांनी वधारून बंद झाला. डिफेन्स शेअर्समध्ये सलग सहाव्या दिवशी जोरदार तेजी दिसून आली. रेल्वे, रिअल इस्टेट, वीज, भांडवली वस्तू आणि उपयुक्तता क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. यामुळे आजच्या व्यवहारात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स २००.१५ अंकांनी घसरून ८२,३३०.५९ वर बंद झाला. तर निफ्टी ४२.३० अंकांनी घसरून २५,०१९.८० वर बंद झाला.आज १६ मे रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४४२.७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील दिवशी म्हणजेच गुरुवार, १५ मे रोजी ४४०.१९ लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २.५५ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.५५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी १६ शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये, इटरनल शेअर्समध्ये सर्वाधिक १.३८ टक्के वाढ झाली. यानंतर, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), एशियन पेंट, आयटीसी आणि टाटा मोटर्सचे शेअर्स ०.३६ टक्क्यांपासून ते १.१० टक्क्यांपर्यंत वाढीसह बंद झाले.तर सेन्सेक्समधील उर्वरित १४ शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलचा शेअर २.८१ टक्क्यांनी घसरून सर्वाधिक घसरला. दुसरीकडे, एचसीएल टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स घसरले.