Pune Crime : बनावट महिलेद्वारे दहा एकर जमीन हडपण्याचा कट! वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल
esakal May 17, 2025 04:45 AM

पुणे/ वाघोली - वाघोली येथील १० एकर जमीन बोगस कागदपत्रांद्वारे हडपण्याच्या उद्देशाने बनावट महिला उभी करून खरेदीखत करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांचाही कथित सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

हा गुन्हा २०२२ ते १७ मे २०२३ दरम्यान घडला. याबाबत पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चंदननगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १६) दुपारी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आनंद लालासाहेब भगत (रा. चिंतामणी पार्क, वाडेगाव, ता. हवेली), शैलेश सदाशिव ठोंबरे (रा. नमो रेसिडेन्सी, ससाणेनगर, हडपसर), राजेंद्र सावरसिद्ध लांडगे आणि अर्पणा यशपाल वर्मा ऊर्फ अर्चना पटेकर (रा. इस्लामपूर, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यापैकी आरोपी आनंद भगतला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील १० एकर जमीन हडपण्यासाठी या चौघांनी संगनमत करून बनाव रचला. अर्चना पटेकर या महिलेला 'अर्पणा वर्मा' असे नाव घेण्यास भाग पाडले. तीच मूळ जमीन मालक असल्याचे भासविण्यात आले. तिच्या नावाने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून खरेदीखताच्या कागदपत्रांची नोंदणी केली.

हा सर्व प्रकार हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. पोलिस चौकशीत सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे करीत आहेत. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.