पुणे - नाले सफाई, पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी महापालिका २५ कोटी रुपये खर्च करत आहे. शहरात पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी महापालिका उपाययोजना करत असून, २०१ पैकी ११७ ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ८४ पैकी ३८ ठिकाणी कामे सुरु असून, ३९ ठिकाणी पावसाळ्यापूर्वी कोणतेही काम करता येणार नाही.
या धोकादायक ठिकाणी तात्पुरती उपाय योजना करा. कोट्यावधी रुपये खर्च करूनही शहरात पाणी तुंबल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करा असे आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहेत.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या सुरु केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी आज (ता. १६) महापालिकेत बैठक घेतली. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, अजय खेडेकर, प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, राहुल भंडारे, माजी नगरसेविका सरस्वती शेंडगे, मंजूषा नागपुरे आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘गेल्या काही वर्षापासून कमी वेळात भरपूर पाऊस पडत असल्याने अनेक भागात पाणी तुंबत आहे. महापालिका प्रशासनाने अशा ठिकाणी उपाय योजना केल्या आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणी तुंबून नागरिकांचे जनजीवन विस्कळित होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे.
मलनिःसारण विभाग, क्षेत्रीय कार्यालये, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश द्यावेत. नाले सफाई व पावसाळी गटारांची स्वच्छता करूनही पाणी तुंबले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा असे आदेश दिले आहे.
पुन्हा एकदा अहवाल सादर करा
शहरातील नाले सफाई व पावसाळी गटारांची स्वच्छता केली आहे असे आयुक्तांनी सांगितले. पण आत्तापर्यंत झालेल्या कामांचा अहवाल पुन्हा एकदा मागवून घ्या, त्यात फोटो आणि व्हिडिओचाही समावेश असला पाहिजे. ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत. ठेकेदारांनी कमी दराने निविदा भरल्याने त्यांना निकृष्ट दर्जाची कामे करता येणार नाहीत. जर चांगली कामे केली नाहीत तर त्यांना काळ्या यादीत टाका असे आदेशही मोहोळ यांनी दिले.
२०० कोटीचा निधी आणण्याचा पुर्नउच्चार
शहरातील नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यात मोहोळ यांची भूमिका महत्त्वाची होती. पण ही निधी मंजूर होऊन दीड वर्ष उलटून गेला तरीही महापालिकेला पैसे मिळालेले नाहीत. तसेच यासाठी काढलेल्या निविदा आमदारांनी विरोध केल्याने रद्द कराव्या लागल्या. शहरात पुराचा धोका असतानाही ही कामे झालेली नाहीत. त्यावर मोहोळ यांनी हा २०० कोटीचा निधी राज्य सरकारकडून आणणार आहे, ही कामे केली जातील, असे सांगितले.