योगेश काशिद, साम टीव्ही
बीड जिल्ह्यातील गुंडाची गुंडगिरी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. परळीत टोळक्याने तरुणाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना अंबाजोगाईत तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. बीडच्या अंबाजोगाईत भर दिवसा तरुणाला पट्टा आणि काठीने तिघांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुलांच्या कामानिमित्त अंबाजोगाई शहरात गेल्यानंतर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता तरुणाला मारहाण झाली आहे. तुझ्या विरोधात कोर्टात केस चालू असताना तू अंबाजोगाईत कसा आला? असे म्हणत तिघांनी पट्टा आणि काठीने बेदम मारहाण केली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता ही मारहाणीची घटना घडली आहे.
अक्षय मस्के असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कमरेचा पट्टा, काठी आणि लाथा बुक्क्यांनी अक्षय मस्के या व्यक्तीला बेदम मारहाण झाली. या मारहानीनंतर जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. अनिल जोगदंड, आकाश बनसोडे आणि चंद्रकांत बनसोडे या तीन आरोपींच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळीत टोळक्याकडून बेदम मारहाणदरम्यान, जलापूर भागात तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. लाठ्या-काठ्या आणि हत्यारांनी ही मारहाण करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमात दोन गटात मारहाण झाली होती. याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाला या मारहाणीमध्ये जबर स्वरूपाची मारहाण झाली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.