Animal Counting : बुद्ध पौर्णिमेला पेंचमध्ये वाघासह बिबट्याचे दर्शन; गणनेत ९९४ प्राणी; ४५१ पक्ष्यांचीही नोंद
esakal May 17, 2025 06:45 AM

नागपूर - बुद्ध पौर्णिमेला (ता. १२) लख्ख चंद्र प्रकाशात, जंगलात वन्यजीव पाणवठ्यावर येतात. पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्र आणि उमरेड- कऱ्हांडला अभयारण्यात पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांची नोंदणी मचाणावर बसून करण्यात आली. त्यात वाघ, बिबट्यासह ९९४ वन्यप्राणी आढळले. या प्रगणनेत ५४३ वन्यप्राणी तर ४५१ पक्ष्यांची नोंद झाली.

प्रगणनेत नागपूर, भंडारा, गोंदिया, छिंदवाडा, शिवनी, बालाघाट या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणचे स्वंयसेवक व वन्यप्रेमी सहभागी झाले होते.

अकरा महिलांचा सहभाग

प्राण्यांची गणना १२ मे रोजी दुपारी तीन ते १३ मे रोजी सकाळी आठपर्यंत करण्यात आली. उपक्रमासाठी १९८ जणांनी अर्ज केले होते. ६३ मचाणावर स्वयंसेवक निरीक्षणासाठी बसले होते. यामध्ये ११ महिलांनी भाग घेतला. कोअरमध्येही मचाण गणना करण्यात आली. त्यातही एक हजारपेक्षा अधिक वन्यप्राण्यांची नोंद झाली आहे. ही गणना फक्त वनमजुरांकडून करण्यात आली, असे प्रभारी उपसंचालक डॉ. भरतसिंह हाडा यांनी कळविले आहे.

नागपूरमध्ये आढळला ‘निळ्या टोपीचा कस्तूर’

हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी नैसर्गिक अधिवासातून अधिक उष्ण प्रदेशाकडे स्थलांतर करतात. थंडीपासून संरक्षण, अन्न उपलब्धता आणि प्रजननासाठी हे पक्षी मध्यभारतात येतात. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या प्रवासात नागपूर शहर एक महत्त्वाचा थांबा ठरत आहे.

सोनेगाव विमानतळाजवळील आमराई परिसरात ‘ब्लू कॅप्ड रॉक थ्रश’(निळ्या टोपीचा कस्तूर) हा स्थलांतरित पक्षी नुकताच आढळला. यापूर्वी या पक्षाची नोंद सेमिनरी हिल परिसरात झाली होती. कस्तूर हा प्रामुख्याने उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आढळतो. हिवाळ्यात तो दक्षिणेकडील केरळ या राज्यामध्ये स्थलांतर करतो.

नागपूर शहराच्या आसपासची नैसर्गिक जागा स्थलांतरित पक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरत आहे. शहराच्या मधोमध असूनही आमराईसारख्या ठिकाणी या दुर्मीळ पक्ष्यांच्या दर्शनाने शहरातील पक्षी निरीक्षकांच्या यादीत नवीन पक्ष्यांची नोंद झाली आहे.

- विशाल अभ्यंक, पक्षी अभ्यासक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.