सोलापूर : दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा मूळ दाखला ऑनलाइन अपलोड करावा लागणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला देताना बहुतेक शाळा विद्यार्थ्यांकडून १०० ते २०० रुपये घेत आहेत. विकासनिधीच्या नावाखाली असे शुल्क शाळांना आकारता येत नाही, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना शाळा सोडल्याचा मूळ दाखला, दहावीचे गुणपत्रक, आधारकार्डची छायांकित प्रत, दोन पासपोर्ट साईज फोटो, आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र अशी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. त्यात शाळा सोडल्याचा दाखला देत असताना बहुतेक संस्था विद्यार्थ्यांना पैसे देण्यासाठी आग्रह धरत आहेत. नियमानुसार माध्यमिक शाळा संहितेत असे शुल्क आकारले जाऊ नये, असे स्पष्ट नमूद आहे. अनेक विद्यार्थ्यांना पैसे नसल्याने दाखले देखील दिले जात नसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत तो दाखला न मिळाल्याने प्रवेशासाठी काही अडचण आल्यास त्या शाळेवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
...तर मुख्याध्यापकांवर होईल कारवाई
माध्यमिक शाळा संहितेनुसार कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखला देताना कोणतेही शुल्क आकारू शकत नाही. तसा प्रकार होत असेल तर संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून तक्रार करता येते. त्यानुसार संबंधित शाळेची चौकशी करून मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
शाखानिहाय प्रवेश क्षमता निश्चित
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यंदा अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश मिळणार आहे. त्याची सुरवात १९ मेपासून होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ४०० कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. त्या सर्व महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी विज्ञान शाखेच्या २६ हजारांपर्यंत, कला शाखेच्या १६ हजारापर्यंत तर वाणिज्य शाखेच्या १५ हजारांपर्यंत एवढ्या जागा आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांचा पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनी १० कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरायचा आहे.