भारतासोबत तणावानंतर आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर आता मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारताने जम्मू-काश्मीरमधील जुन्या कालव्यांच्या पुनर्बांधणी आणि विस्तारकामाला सुरुवात करण्याचा निर्णय़ घेतलाय. यात कठुआ, न्यू प्रताप आणि रणबीर या कालव्यांचा समावेश आहे. १०० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर पहिल्यांदा हे कालवे सुरू केले जातील.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला होता. पहलगाम हल्ल्यात २६ जणांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. याशिवाय पाणीही बंद केलं होतं.
जम्मू काश्मीर सरकार आणि केंद्र सरकारच्या तांत्रिक टीमच्या देखरेखीखाली रणबीर, न्यू प्रताप, रंजन, तावी लिफ्ट, परगवाल, कठुआ, रावी कालव्यांमधला गाळ हटवण्याचं काम टप्प्याने सुरू केलं जाईल. यानंतर कालव्यांचा विस्तार करण्यात येईल. यामुळे कालव्यांची क्षमता वाढेल आणि सिंचन क्षेत्रही वाढवता येईल.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं की, या कालव्यांची क्षमता गेल्या शतकानुसार ठरवली होती. पण आता शेतीची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. या कालव्यांच्या पुनर्बांधणीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतातील एकूण ६० टक्के क्षेत्र हे मान्सूनवर अवलंबून आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाऊस उशिरा पोहोचतो आणि लवकर संपतो.
रणबीर कालवा १९०५ मध्ये बांधला होता. हा ६० किमीचा कालवा असून जम्मू काश्मीरमधील प्रमुख सिंचन लाइन होता. १९०६ मध्ये बांधलेला प्रताप कालवा ८ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचन करत होता. तर नवा प्रताप कालवा ९०३० हेक्टर क्षेत्रात सिंचन करू शकतो.