हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते पण, धर्म… संजय राऊत यांच्या पुस्तकातील दावा काय?
GH News May 17, 2025 06:07 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक चर्चेत आले आहे. या पुस्तकात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी पडद्यामागच्या अनेक घडामोडींवर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पुस्तकातील आणखी एक गौप्यस्फोट समोर आला आहे. तो म्हणजे हसन मुश्रीफ हे ठाकरे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी आघाडीवर होते. पण त्यांचा धर्म आड आल्याने त्यांची गृहमंत्रीपदाची संधी हुकली, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी पुस्तकात केला आहे.

राऊत पुस्तकात म्हणतात…

महाविकास आघाडी सरकारचे बाळंतपण साधे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्याचा विचार होईल, असे मला वाटले नव्हते. छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर खटले चालू होते. भुजबळ यांची गृहमंत्री होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांच्यात क्षमताही होती पण त्यांच्या तुरुंग प्रवासाची अडचण ठरली असावी. जयंत पाटील यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी नकोच होती. तो एक थँकलेस जॉब आहे, असे त्यांचे म्हणणे होते. वळसे-पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या. कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगडा गडी. मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केलं जाईल, अशी भीती पवारांना वाटली. खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेलेल कार्यकर्ते, पण शेवटी धर्म आडवा आला, असं संजय राऊत यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

तेथूनच देशमुखांच्या रस्त्याचे काटे…

गृहमंत्री कोण? या प्रश्नावर एकदा शरद पवार म्हणाले, विदर्भातला नवा प्रयोग करून पाहू या. तो प्रयोग म्हणजे अनिल देशमुख. देशमुखांनी गृहखाते उत्तम सांभाळले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी त्यांचे उत्तम नाते होते. पण तीन प्रमुख पक्षात बदल्या, बढत्या आणि नेमणुकांच्या कटकटी असतात. त्या देशमुखांच्या वाट्याला आल्या. देशमुख हे नागपूरचे. त्या आधी फडणवीस हेच नागपूरचे सत्ताकेंद्र होते. देशमुख गृहमंत्री होताच सर्व काही बदलले. देशमुखांचा नागपूर-विदर्भातील वाढता प्रभाव, गृहखात्याचे वलय, त्यांना मिळणारे सॅल्यूट हे जुन्या सत्ताकेंद्रास सहन झाले नाहीत आणि तेथूनच देशमुखांच्या रस्त्याचे काटे निर्माण होऊ लागेल.

वाझे आले नसते तर, अनेक कटू…

एका प्रकरणात राऊत म्हणतात. अनिल देशमुख अनेकदा अस्वस्थ दिसले. माझं काय चुकलं? हा प्रश्न ते स्वत:ला विचारीत. त्यांच्या प्रश्नांचे उत्तर सचिन वाझे हेच होते. सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता, तर महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक कटू प्रसंग टाळता आले असते. सचिन वाझेला नोकरीला घेण्याच्या निर्णयाशी अनिल देशमुख यांचा संबंध नव्हता. वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती. त्याची फळे देशमुखांना भोगावी लागली. माझ्या पाठीत तीन खंजीर खुपसले असे देशमुख कळवळून सांगत. त्या खंजीराचे रहस्य रोमांचक आहे. त्यावर देशमुखांनी स्वतंत्र पुस्तक लिहिले, असं राऊत यांनी म्हटलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.