नाशिक- केंद्रीय प्रवेशप्रक्रियेंतर्गत गुरुवारी (ता. १५) अंतिम दिवशी महाविद्यालयांनी केलेल्या ऑनलाइन नोंदणीनुसार जिल्ह्यात अकरावीच्या विविध शाखांच्या एकूण ८९ हजार १६० जागा उपलब्ध आहेत. त्यात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक ३४ हजार ७६० जागांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान प्रवेशासाठी आनलाईन अर्ज नोंदणीस सोमवारपासून (ता.१९) सुरवात होत आहे.
गेल्या आठवड्यात दहावीचा निकाल घोषित झाला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता अकरावीच्या प्रवेशासाठीचे वेध लागले आहेत. प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी राज्य शासनातर्फे केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात महाविद्यालयांना त्यांच्याकडील शाखानिहाय उपलब्ध जागांची माहिती देणे बंधनकारक असते. अनुदानित व विनाअनुदानित जागा, विषयनिहाय प्रवेश क्षमता, शुल्क आकारणी, इनहाउस व मॅनेजमेंट कोटा आदींची माहिती शासनाला सादर करावी लागते.
शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना ऑनलाइन नोंदणीसाठी गुरुवार (ता.१५) पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी त्यांच्याकडील शाखानिहाय जागांची माहिती सादर केली आहे. विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा असून, त्या खालोखाल कला शाखेच्या ३४ हजार २०० जागांची नोंद झाली आहे; तर वाणिज्य शाखेच्या अवघ्या १८ हजार २०० जागा उपलब्ध असून, संयुक्तच्या दोन हजार जागांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, महाविद्यालयांची नोंदणी झाल्यावर विद्यार्थ्यांना सोमवार (ता.१९)पासून २८ मे या काळात प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत असेल.
नोंदणीसाठी मुदतवाढ?
जिल्ह्यात महाविद्यालयांनी केलेल्या नोंदणीत विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या जागा घटल्याचे दिसून आले. त्यामुळे अद्यापपर्यंत शाखानिहाय जागांची नोंदणी न केलेल्या महाविद्यालयांना शेवटची संधी देण्याबाबत शिक्षण विभागात खल सुरू आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीसाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी वाढविल्यास विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये काहीअंशी वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शाखानिहाय जागांची संख्या
विज्ञान : ३४,७६०
वाणिज्य : १८,२००
कला : ३४,२००
एकूण : ८९,१६०