आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पुण्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुण्यात कात्रज विकास आघाडी शिवसेनेत विलीन झाली. कात्रज विकास आघाडीने देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपततात्या गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी संग्राम बाबर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं.
कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून गेली १५ वर्षे कार्यरत असलेल्या नमेश यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे केलेल्या कात्रजचा विकास आराखडा, कात्रजची वाहतूक कोंडीची समस्या, पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली असून या समस्या सोडवायला त्यांना नक्की सहकार्य करू असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी बोलताना सांगितले.
त्यांच्यासोबत असलेल्या लाडक्या बहिणींनी त्यांना शिवसेनेसोबत येण्याचा सल्ला दिला असे त्यांनी सांगितले असून त्यांनी शिवसेनेवर दाखवलेला हा विश्वास नक्की सार्थ ठरवू असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. त्यांच्यासोबत अनेक पैलवानांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला असून त्यामुळे शिवसेना अधिक बलवान झाली असल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव राम रेपाळे, रणजीत पायगुडे आणि शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.