घातपाताचा संशय आल्याने हरसूल पोलिसांनी शुक्रवारी (दि.१६) सकाळी त्र्यंबरकेश्वर तालुक्यातील चिंचवड गावामध्ये अंत्यविधीची तयारी सुरु असतानाच मृतदेह ताब्यात घेत नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले. शवविच्छेदनात गळफास घेतल्याने ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, मृत पुरुषाने गळफास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत घेतला आणि अंत्यविधी हरसूल पोलीस ठाण्यात केले जाणार असल्याचे समजताच नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांची धावपळ झाली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Police took the body for autopsy while the funeral was underway on suspicion of murder; autopsy revealed that the deceased had committed suicide by hanging)
जनार्दन नारायण भोये (वय ४७, मूळ रा. चिंचवड, हरसूल, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक, सध्या रा. सोमेश्वर कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक) असे मृत पुरुषाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जनार्दन भोये यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.१६) अंत्यसंस्कार केले जाणार होते. मात्र, त्यांच्या मृतदेहावर वण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात आणला. अपघात कक्षात डॉ. शिंदे यांनी भोये यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शवविच्छेदन कक्षात नेण्यात आला. शवविच्छेदनात भोये यांनी गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस व नातलगांनी मृतदेह चिंचवडला नेला.
पोलिसांना कोणतीही माहिती न देता मृतदेह नाशिक शहरातून थेट हरसूलजवळील चिंचवडला नेल्याने पोलिसांची धावपळ झाली होती. भोये यांचे कुटुंबिय ग्रामीण भागातील असल्याने आणि त्यांची कोणाविरुद्धही तक्रारी नसल्याने पोलिसांना कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, या घटनेमुळे पोलिसांनी गळफास घेतलेल्या व्यक्तीबाबत माहिती द्यावी. परस्पर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवू नये, असे आवाहन केले आहे.
जनार्दन भोये यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.१६) सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार होते. त्यानुसार अंत्यविधीची चिंचवडमध्ये तयारी सुरु होती. सर्व नातलगही अंत्यविधीसाठी आले होते. दरम्यान, भोये यांच्या मानेला वण असल्याची माहिती हरसूल पोलिसांना मिळाली. संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक मोहित मोरे, अंमलदार मोहित सोनवणे व पोलीस रतन शिंगाडे घटनास्थळी गेले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. त्यामुळे गळफास घटनेचा उलगडा झाला.
जनार्दन भोये यांना दारूचे व्यसन होते. ते गुप्ता गार्डन परिसरात वॉचमन म्हणून नोकरी करत होते. त्यांनी गुरुवारी (दि.१५) सोमेश्वर कॉलनीत गळफास घेतला. नातलगांनी त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी हरसूलजवळील चिंचवडमध्ये नेला. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदनात भोये यांनी गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
– जग्वेंद्रसिंग राजपूत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे