भाषेच्या अचूक वापराचा मंत्र
esakal May 18, 2025 07:45 AM

- जे. आर. मराठे, editor@esakal.com

मराठी भाषा अभ्यासक माधव राजगुरु यांचे मराठीभाषा आणि बालसाहित्य यांच्याबद्दलचे कार्य सर्वश्रुत आहे. ‘किशोर’, ‘जीवनशिक्षण’, ‘शिक्षण संक्रमण’ आदी मासिकांद्वारा त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले आहे.

त्यांच्या शुद्धलेखनविषयक पुस्तिका लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रभर फिरत आहेत. आपल्या नव्या पुस्तकात राजगुरु यांनी शुद्धलेखनाला मुद्रितशोधनाशी निगडित काम केले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच एक ब्रीदवाक्य येते : व्याकरण हे भाषेचे चारित्र्य असते आणि ते जपण्याचे कार्य मुद्रित-शोधनातून घडते.

मो. रा. वाळंबे यांच्यापासून ते आजपर्यंत मराठीच्या शुद्धलेखनाविषयी अनेकांनी लिहिले असले, तरी ते सर्व आत्मसात करून एक नव्या स्वरुपाचा ग्रंथ राजगुरु यांनी सिद्ध केला आहे, की शुद्धलेखन आणि मुद्रितशोधन या दोन्हींच्याही बाबतीत इकडून तिकडून माहिती मिळवण्याची संबंधितांना गरज उरलेली नाही, हे या पुस्तकाचे फार मोठे यश म्हणता येईल.

राजगुरु आपले प्रतिपाद्य मांडताना एक सुंदर चर्चा घडवितात हे त्यांचे विलोभनीय असे वैशिष्ट्य आहे. आता शुद्धलेखन या शब्दाविषयीच त्यांनी केलेली सुंदर चर्चा पाहा - व्यवहारात प्रत्येक शब्द एक किंवा अनेक अर्थाने वापरला जातो. त्यातून अभिप्रेत अर्थ लक्षात घेणे आवश्यक असते.

कोशात ‘शुद्ध’ शब्दासाठी पवित्र, पापरहित, निर्मल याबरोबरच निर्दोष, बरोबर, चोख, अचूक, योग्य असे इतरही अर्थ दिले आहेत. इथे ‘शुद्ध’ शब्द लेखनाच्या संदर्भात वापरल्यामुळे तो पवित्र, पापरहित अशा धार्मिक संदर्भाने न घेता अचूक, बरोबर, योग्य या अर्थाने स्वीकारणे अपेक्षित आहे. म्हणजे शुद्धलेखन या शब्दाचा अर्थ अचूक किंवा बरोबर केलेले लेखन असे म्हणता येईल.

अ. भा. साहित्य महामंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करून केलेले लेखन म्हणजे शुद्धलेखन होय. ही राजगुरुंची व्याख्या स्वीकारार्ह वाटते. या पुस्तकाचे नावीन्य म्हणजे शासनाच्या अलीकडच्या आदेशांनुसार मराठीत दाखल झालेले ‘ॲ’ आणि ‘ऑ’ हे दोन इंग्रजी स्वर.

या स्वरांसकट मराठी वर्णमालेत चौदा स्वर, दोन स्वरादि, चौतीस व्यंजने, दोन संयुक्त व्यंजने अशी मराठीची एकूण वर्णसंख्या आता बावन झाली आहे. माधव राजगुरु यांनी या पुस्तकाच्या पहिल्या एक तृतीयांश भागात छोट्या छोट्या प्रकरणांची रचना केली आहे. इतर भाषेतून आलेले आणि मराठीत रुळलेले शब्द आपण स्वीकारलेच पाहिजेत अशी योग्य भूमिका त्यांनी घेतली आहे.

हे परभाषीय शब्द पाहुण्यांसारखे आले आणि हळूहळू इतके रुळले की ते आता मराठीच झालेले आहेत. राजगुरुंनी संस्कृत, इंग्रजी, उर्दू, अरबी, फारसी आणि पोर्तुगीज भाषांतून आलेले काही शब्द वानगीदाखल दिलेले आहेत.

मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे. त्याअर्थी संस्कृत शब्दांची संख्या विपुल असणार. त्यांना तत्सम शब्द म्हणतात आणि ते ओळखायलाही येत नाहीत. इंग्रजी शब्द मात्र ओळखायला येतात. आग, आलाप, आवाज, बाजार हे उर्दूतून आलेले शब्द आहेत. इमारत, उसंत, कायदा, हिंमत, हिशेब हे अरबीतून आलेले शब्द आहेत. कारभार, चाबूक, दिरंगाई, महिना, लेझीम, चहा हे फारसीतून आलेले शब्द आहेत. काजू, कंपू, काडतूस, घमेले, पगार, हापूस हे पोर्तुगीज भाषेतून आलेले शब्द असल्याचे राजगुरु नोंदवितात.

पुस्तकाच्या नंतरच्या भागात मराठी शुद्धलेखनाची बारकाईने आणि विस्तृत अशी चर्चा राजगुरु यांनी केलेली आहे. मराठीमध्ये इतकी सुंदर आणि मौलिक चर्चा यापूर्वी कोणीही केलेली नाही. मुख्य म्हणजे ती अद्ययावत अशी आहे. या पुस्तकात शुद्धलेखनाची मुद्रितशोधनाशी (Proof-reading) सांगड का घातली या प्रश्नाचे संपूर्ण पुस्तक अभ्यासल्यानंतर समर्पक उत्तर मिळते.

शुद्धलेखन हे भाषेचे चारित्र्य असते आणि ते जपण्याचे काम मुद्रितशोधक करत असतात. भाषेतील कोणताही लिखित किंवा मुद्रित शब्द लोकांसमोर जाताना तो शुद्ध स्वरूपातच गेला पाहिजे. अन्यथा चुकीचे शब्दप्रयोग लोकरूढ होण्याचा धोका असतो. असे होऊ नये म्हणून शुद्धलेखन व मुद्रितशोधन या दोन घटकांची सांगड घालून सदर पुस्तकाची सिद्धता केली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल, असे हे पुस्तक आहे.

या ग्रंथाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात सुमारे एकशे दहा पाने आणि प्रत्येक पानावर चार स्तंभ करून दिलेली शुद्ध शब्दांची सूची. अशा प्रकारची सूची करण्याचे मौलिक प्रयत्न यापूर्वी डॉ. यास्मिन शेख, अरुण फडके आदि अनेकांनी केले आहेत. त्यामुळे सामान्य माणसांपासून विद्वानांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून मुद्रितशोधकांपर्यंत प्रत्येकाला आपले लेखन शुद्ध ठेवण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी पडेल यात शंका नाही.

पुस्तकाचे नाव : मराठी शुद्धलेखन व मुद्रितशोधन (परंपरा आणि व्यवहार)

लेखक : माधव राजगुरु

प्रकाशक : अनमोल प्रकाशन पुणे. (०२०- २४४५८५६९, ९९२२९५३६३२)

पृष्ठे- १८० मूल्य : १५० रुपये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.