इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला साधारण आठवड्याभराच्या स्थगितीनंतर १७ मे रोजी सुरूवात झाली आहे. भारत-पाकिस्तान युद्धजनक परिस्थितीमुळे ९ मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आले होते.
त्यानंतर १७ मे पासून पुन्हा स्पर्धेला सुरुवात झाली. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्टने आयपीएलमधील सर्वोकालिन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
त्याने संघ निवडताना एक निकष लावला होता. संघातील प्रत्येक खेळाडूने आपल्या कारकिर्दीत आयपीएलचं प्रतिष्ठेचं विजेतेपद जिंकल्याचा अनुभव घेतलेला असावा. त्यामुळे त्याच्या संघात आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघातील अधिक खेळाडू आहेत.
मात्र यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीचे नाव गिलख्रिस्टच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही.
गिलख्रिस्टने क्रिकबझशी बोलताना हा संघ निवडला. त्याने कर्णधार म्हणून चेन्नई सुपर किंग्सचा यशस्वी कर्णधार एमएस धोमीला निवडले आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच त्याने चेन्नईचे दोन अनुभवी शिलेदार सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांचीही या संघात निवड केली आहे.
तसेच मुंबई इंडियन्सचा ५ वेळचा विजेता कर्णधार रोहित शर्मालाही या संघात स्थान मिळाले असून अष्टपैलू कायरन पोलार्ड, स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव, दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मुंबईच्या खेळाडूंचाही गिलख्रिस्टच्या संघात समावेश आहे.
याशिवाय गिलख्रिस्टने कोलकाता नाईट रायडर्सच्या अष्टपैलू सुनील नरेनलाही संघात घेतला आहे. याशिवाय डेव्हिड वॉर्नरलाही संघात स्थान मिळाले आहे, त्याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने २०१६ साली विजेतेपद पटकावले होते. याशिवाय भूवनेश्वर कुमारचीही निवड त्याने या संघात केली आहे.
ऍडम गिलख्रिस्टची सर्वोत्तम आयपीएल इलेव्हनएमएस धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, सुनील नरेन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, भूवनेश्वर कुमार