भारत आणि पाकिस्तानातील सीझफयार अर्थात युद्धविराम आज संपणार आहे का ? 12 मे रोजी झालेल्या डीजीएमओ स्तरावरील चर्चेत 18 मे पर्यंत युद्धबंदी वाढवण्याचा करार झाला होता का? आज पुन्हा दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये बैठक होणार आहे का? असे अनेक प्रश्न सध्या कोट्यावमधी भारतीयांच्या मनात आहेत. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं थेट भारतीय सैन्याकडून मिळाली आहेत. आज युद्धविराम संपणार,या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिलं आहे. भारत पाकच्या डीजीएमओंची आज कोणतीही नियोजित चर्चा नाही. 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ एकमेकांशी बोलले तो शेवटचा संवाद होता. त्यानंतर कोणतीही चर्चा नव्हती असं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी केलं विधान
खरं तर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी अलीकडेच सिनेटला सांगितले की, 14 मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात हॉटलाइनवर चर्चा झाली, ज्यामध्ये युद्धविराम वाढवण्यासाठी एक करार झाला. ते म्हणाले की, 10 मे रोजी पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये हॉटलाइनवर चर्चा झाली, ज्यामध्ये युद्धविराम 12 मे पर्यंत वाढवण्यात आली. 12 मे रोजी पुन्हा चर्चा झाली आणि ती 14 मे पर्यंत वाढवण्यात आली. 14 मे रोजी झालेल्या चर्चेत, युद्धविराम 18 मे पर्यंत वाढवण्याचा करार झाला असे ते म्हणाले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील दीर्घकाळापासून सुरू असलेला सिंधू पाणी कराराचा वाद सोडवला नाही तर सीझफायर करार धोक्यात येऊ शकतो, असे उपपंतप्रधान इशाक दार यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी 1960 चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला चिथावणीखोरी म्हटले होते. जर हा प्रश्न सोडवला गेला नाही तर ते Act Of War मानले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले होते.
18 तारखेला युद्धविराम संपणार नाही
18 तारखेला भारतृपाकमधील युद्धविराम संपणार आणि पुन्हा संघर्शाची शक्यता आहे, अशा बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. मात्र त्यावर भारतीय लष्कराकडून स्पष्टीकरण देण्यात आल आहे. अशी कोणत्याही पद्धतीची चर्चा झालेली नव्हती. तसेच भारत-पाक या दोन्ही देशांचे डीजीएमओ आज पुन्हा चर्चा करतील, अशा पद्धतीची चर्चाही रंगू लागली होती. मात्र अशा पद्धतीची कोणतीही नियोजित चर्चा आज नाही असेही लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओंमध्ये शेवटचा संवाद झाला, त्यावेळेस सीझफायरचा निर्णय झाला होता. त्याबद्दलच्या ज्या अटी-शर्ती होत्या, तेव्हाच त्याची सविस्तर चर्चा झाली होती. सीझफायरला कोणतीही मुदत दिलेली नव्हती, एक्सपायरी डेट नव्हती असंही भारतीय लष्कराने सांगितलं आहे. त्यामुळे युद्धविराम आज संपणार अशा ज्या चर्चा सुरू आहेत, त्या पूर्णपणे खोट्या असल्याचं लष्कराने स्पष्ट केलं आहे.