Electric Shock Accident : शेतात काम करताना वीजेचा शॉक; एकाचवेळी काका-पुतण्याचा मृत्यू
esakal May 18, 2025 05:45 PM

शिरखेड : मोर्शी तालुक्यातील निंभी गावामध्ये शेतात काम करीत असताना एकाचवेळी काका व पुतण्याचा विजेचा जोरदार धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला. शनिवारी (ता. १७) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडली.

संजय बळिराम भुयार (वय ६०) व प्रणव गणेश भुयार (वय १९, दोघेही रा. निंभी, ता. मोर्शी), असे विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या काका-पुतण्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. भुयार यांनी शेतात कांद्याचे पीक घेतले होते.

पाणी देण्यासाठी सकाळी काका आणि पुतण्या, असे दोघेही शेतात नेहमीप्रमाणे गेले. घटनेच्या वेळी काही मजूरही आसपास हजर होते. ग्रामस्थांच्या मते सकाळी विजेचा पुरवठा खंडित झालेला असताना दोघांनी पाण्यासाठी लावलेली मोटार इतरत्र हलविण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना विजेचा धक्का बसून दोघेही गंभीर झाले.

आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. आसपासचे शेतकरी व शेतमजुरांनी घटनास्थळी धाव घेतली. संजय भुयार व प्रणव भुयार यांना एका कारमध्ये टाकून उपचारासाठी अमरावती येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथून दोघांनाही सकाळी अकरा ते साडेअकराचे सुमारास नातेवाइकांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणीअंती काका व पुतण्या या दोघांनाही मृत घोषित केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.