मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग हे तुरुंगवासातील अनुभवावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडत आहे. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या अटकेसंबधी मोठा खुलासा केला आहे. पत्राचाळ प्रकरण हे निमित्त होते मात्र यासंबंधीचे वेगळे कारण त्यांनी सांगितले आहे.
कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, संजय राऊतांनी जे १०० दिवस आर्थर रोड जेलमध्ये घालवले.ते लिखित स्वरुपात आपल्या समोर मांडले. कुणी गुन्हा केला आहे. केस झाली असेल. त्याचा निकाल लागला असेल तर असे संकट लोकांवर येते. त्यांना अटक करतात. संजय राऊतांनी काय केले होते. राऊत सामनात रोखठोक भूमिका मांडतात. त्यांची लेखणी काही लोकांना पटत नव्हती. ते अस्वस्थ होते. ते संधींची वाट पाहत होते. पत्राचाळ प्रकरणाने त्यांना संधी दिली.
जिथे अन्याय होतो. अत्याचार आहे. त्याच्याविरुद्ध संजय राऊत हे अखंडपणाने काम करत होते. शासकीय यंत्रणमध्ये जिथे भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराविरुद्ध ते नेहमीच लिहितात. मुंबई महाराष्ट्रात काही लोक चुकीचं काम करतात हे माहित असताना त्यांच्यासंबंधीची कारवाई होत नव्हती. खासदार म्हणून राऊतांनी देशाच्या प्रमुखांना यासंबंधीचे पत्र लिहिले. जे लोक शासकीय यंत्रणेशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवातात अशा लोकांच्या मार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचे सविस्तर लिखाण त्यांनी केंद्र सरकारला कळवले. त्यात ३० ते ३५ लोक, कंपन्या होत्या. त्यांच्याकडून पैसे काढले गेले. ती रक्कम ५८ कोटी पर्यंत होती. संजय राऊतांच्याकडे ही माहिती आल्यानंतर त्यांनी देशांच्या प्रमुख लोकांना ही माहिती लिखित स्वरुपात लिहिली. त्याचा परिणाम एकच झाला कारवाई झाली नाही.पण त्यांना अटक केली. आणि १०० दिवस त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.