भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या १०१व्या मोहिमेला धक्का बसला. पीएसएलव्हीच्या उड्डाणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचणीमुळे मोहिमेत अपयश आलं. रविवारी सकाळी सतीश धवन सेंटरवरून पीएसएलव्ही उपग्रहाने उड्डाण केलं पण प्रक्षेपणानंतर तो ठरलेल्या कक्षेत पोहोचू शकला नाही. इस्रोची १०१वी मोहिम अयशस्वी ठरल्याची माहिती इस्रोने दिलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उपग्रहाचे प्रक्षेपण झाले. सतीश धवन अंतराळ केंद्रातून झालेलं हे १०१वं प्रक्षेपण होतं. प्रक्षेपणानंतर इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितलं की, या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे पहिले दोन टप्पे ठरल्यानुसार पार पडले. मात्र तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचणी आल्या.
प्रक्षेपणाचे चार टप्पे होते. तिसऱ्या टप्प्यात इंजिन सुरू झाले पण तांत्रिक अडथळ्यामुळे मोहिम पूर्ण होऊ शकली नाही. तांत्रिक अडथळे दूर करून आम्ही पुन्हा प्रयत्न करू असंही इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितलं.