इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचे पुनरागमन यंदा चर्चेचा विषय राहिला. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला गेल्यावर्षी पहिल्यांदाच हार्दिकच्या नेतृत्वात खेळताना शेवटच्या क्रमांकावर रहावं लागलं होतं. त्यानंतर यावर्षीही त्यांची कामगिरी सुरुवातीला चांगली झाली नव्हती.
पहिल्या ५ सामन्यांमध्ये केवळ एकच सामना मुंबईला जिंकता आला होता. पण त्यानंतर मुंबईने पुनरागमन केलं. मुंबईने नंतर सलग ६ सामने जिंकले. त्यामुळे मुंबई १२ सामन्यांमध्ये ७ विजयासह १४ गुण मिळवून सध्या चौथ्या क्रमांकावर असून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दावेदार आहेत.
मुंबई इंडियन्सने केलेल्या या पुनरागमनाचे कौतुक माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनीही केले आहे. त्यांनी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याचेही कौतुक केले आहे.
त्यांनी स्टार स्पोर्ट्सच्या प्रेस रुममध्ये बोलताना म्हटले की 'गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हार्दिक पांड्याला प्रेक्षकांकडून पाठिंबा मिळाल्याचे आपण पाहिले. गेल्यावर्षी तो थोडा बावरलेला होता की मुंबईचे प्रेक्षक आणि मुंबईचे चाहते त्याला खूप पाठिंबा देत नव्हते. पण यावर्षी सर्वजण त्याच्या पाठीशी आहेत. आणि ते सर्व जण त्याला जाऊन जिंकण्यासाठी सांगत आहेत. त्यांना आता २१ ला वानखेडे स्टेडियमवर एक सामना खेळायचा आहे.'
याशिवाय गावसकरांनी हार्दिकच्या शांत आणि संयमी स्वभावाचेही कौतुक केले. ते म्हणाले की 'संघाने ज्या पद्धतीने पुनपरागमन केले, ते आपण पाहिले.आपण त्याच्या विचारसरणीबद्दल आणि त्याचा शांत स्वभाव कसा पाडतो, त्याबद्दल बोलतोय.त्याने मैदानात कोणतीही भावना दाखवलेली नाही. जेव्हाही क्षेत्ररक्षणात चूक झाली, एखादा झेल सुटला, तेव्हा तो फक्त मागे जाऊन आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जागेवर जाऊन उभा राहिला.'
ते पुढे म्हणाले, 'जेव्हा कर्णधार कोणतेही हावभाव करतो, तेव्हा क्षेत्ररक्षक थोडा नर्व्हस होतो. पण त्याने ते हावभाव केले नाहीत. कदाचित हे एक कारण आहे की मुंबई इंडियन्सने इतकं चांगलं पुनरागमन केलं आहे. आणि यावर्षी मुंबई इंडियन्सचा चाहता म्हणून मला आशा आहे की ते जिंकतील.'
मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ स्पर्धेत साखळी फेरीत २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आणि २६ मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध सामना खेळायचा आहे.