bread pizza toast: उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याला उगीच बाहेर खायची इच्छा होते. मुलं-मुली पिझ्झा-बर्गर हवे म्हणून आई-बाबांकडे सारखा हट्ट धरतात. पण बाहेरचा महागडा पिझ्झा सारखा खाणे अयोग्यच. त्याऐवजी आपण कधीतरी घरच्या घरी ब्रेडपासूनही पिझ्झा करू शकतो. चविष्ट पिझ्झा टोस्ट कसा बनवायचा आणि लागणारे साहित्य कोणते हे जाणून घेऊया.
पिझ्झा टोस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्यब्रेडचे स्लाइस (शक्यतो मल्टिग्रेन वा गव्हाचा ब्रेड.)
लोणी
टोमॅटो सॉस
चीज क्यूब्ज
कांदा
टोमॅटो
ढोबळी मिरची
ओरेगॅनो पिझ्झा सिझनिंग
चिली फ्लेक्स किंवा तिखट पूड
पिझ्झा टोस्ट बनवण्याची कृतीब्रेडच्या स्लाइसला एका बाजूला थोडे लोणी लावा. त्यावर टोमॅटो सॉस पसरून लावा. कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची यांचे तुम्हाला आवडतील तसे काप करून घ्या. भाज्यांचे काप ब्रेडवर सगळीकडे पसरा. ब्रेडवर चीज क्यूब किसून घाला. आवडत असल्यास त्याच्यावर ओरेगॅनो पिझ्झा सिझनिंग व चिली फ्लेक्स (किंवा लाल तिखट) भुरभुरा. गॅसवर तवा किंवा फ्राईंग पॅन ठेवून त्यावर थोडे लोणी घाला. लगेच उलथण्याच्या साह्याने भाज्या व चीज घातलेला ब्रेडचा स्लाइस तव्यावर ठेवा. आच मंद ते मध्यम ठेवून अर्धा ते एक मिनिट ब्रेडचा स्लाइस भाजा. हा स्लाइस उलटायचा नाही. भाजला गेल्यानंतर ब्रेडचा स्लाइस ताटलीत काढा. असे सर्व पिझ्झा टोस्ट तयार करा. गरम असतानाच त्यांचा आस्वाद घ्या.
काय काळजी घ्यावी?भाज्या चिरताना सुरी वापरावी लागणार आहे. ब्रेडचा स्लाइस अलगद गरम तव्यावर ठेवताना व तव्यावरून उलथण्याने उचलून ताटलीत काढतानाही सांभाळावे लागते. या कामांसाठी घरातल्या मोठ्या माणसांची मदत घ्या.
पुढील प्रयोग करु शकतापिझ्झा टोस्टच्या 'टॉपिंग्ज'मध्ये तुम्ही खूप प्रयोग करू शकाल. नुसते चीज, टोमॅटो सॉस (किंवा तयार पिझ्झा सॉस) व बेसिलची पाने वापरून 'मार्गारिटा पिझ्झा टोस्ट' होतो. नुसते मीठ-मिरपूड घालून तेलावर परतलेली मशरूम्स घालूनही पिझ्झा टोस्ट छान लागतो.