Orange Alert : पुण्यात वादळी वारे, गारपिटीसह मुसळधार; दोन जिल्हे वगळता राज्यभरात पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
esakal May 18, 2025 03:45 PM

पुणे - राज्यात पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. रविवारी (ता. १८) राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपीट होण्याची, तसेच सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्यांची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाची हजेरी कायम आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला आहे. कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, तसेच विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा जिल्ह्यांत विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली. पावसाच्या हजेरीने तापमानात घसरण होत असली तरी उकाडा कायम आहे.

शनिवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.७ अंश तापमानाची नोंद झाली. ‎चंद्रपूर आणि नागपूर येथे ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, ‎गोंदिया, ‎परभणी, अकोला, अमरावती, ‎वर्धा, गडचिरोली आणि ‎यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. विदर्भवगळता उर्वरित राज्यात कमाल तापमान कमी झाले आहे.

आज (ता. १८) संपूर्ण विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. पुण्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑरेंज अलर्ट : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर.

यलो अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.