मांडव टहाळ्यामधून ग्रामसंस्कृतीचे पुन्हा दर्शन
काळानुरूप बदल ः लाखो रुपयांचा खर्च, डीजेवर नवरा-नवरीची मिरवणूक
संदीप भेगडे ः सकाळ वृत्तसेवा
किवळे, ता. १८ : खेडेगावांबरोबरच शहरात लग्नसोहळ्यानिमित्त मांडव टहाळ्यामधून ग्रामीण संस्कृतीचे पुन्हा मोठ्या प्रमाणावर दर्शन घडू लागले आहे. ग्रामीण प्रथेप्रमाणे नवरदेव आणि नवरीची बैलगाडीमधून मिरवणूकही काढली जात आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्याचे स्वरुप बदलले असून डीजेच्या तालावर ही मिरवणूक काढली जात आहे. त्यासाठी लाखो रुपयांपर्यंत खर्च केले जात आहेत.
एखाद्या घरातील लग्नकार्य म्हणजे केवळ नवरा आणि नवरीच्या संपूर्ण आयुष्या पुरतेच मर्यादित नसते. या पवित्र बंधनामधून त्यांची दोन कुटुंबे, नातीगोती, गावकी-भावकीचे संबंध दृढ होत असतात. त्यामुळे मुलगी असो वा मुलगा दोन्हींच्या घरी लग्न एकदा ठरलं की बस्ता, मांडव टहाळा, हळद, पान सुपारी आदी कार्य केले जातात. अलीकडच्या काळात मांडव टहाळा मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे.
साधारणतः ४० ते ५० वर्षांपूर्वी खेडेगावात अनेकांची लग्न कार्ये घराच्या पटांगणात होत असत. त्यासाठी लग्नाच्या ४ ते ५ दिवस अगोदर लग्न घरी मांडव टहाळे टाकले जात असत. त्यावेळेस मांडवासाठी मोठे कापड उपलब्ध नसल्याने मांडवावर आंब्याच्या डहाळ्या टाकण्याची पद्धत होती. लग्न घरांतील मंडळी त्यासाठी रानामध्ये जाऊन बैलगाड्यांमधून आंब्याची डहाळ्या आणून त्या मांडवावर टाकल्या जात असत. त्यानिमित्त हळद दळणे, महिला मंडळींना बांगड्या भरण्यासारखे कार्यक्रम होत असत. तसेच भोजनाचाही कार्यक्रम होत असे.
अलीकडच्या काळात खेडेगावांबरोबरच शहरातही मांडव टहाळ्याचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे. मात्र, त्याच्या स्वरुपात बदल झाला आहे. साधेपणा जाऊन मांडव टहाळा आणि डीजेवरील नवरा-नवरीच्या मिरवणुकीवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. लग्न लागल्यावर बैलगाडीतून डीजेच्या तालावर बोहल्यावर चढलेल्या नवरी आणि नवरदेवाची त्यांच्या गाव आणि शहराच्या ठिकाणी मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी सग्या सोयऱ्यांसोबतच रस्त्याने ये- जा करणाऱ्यांचे पाय स्थिरावतात.
मांडव टहाळा मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो, ही आनंदाची बाब आहे. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चावर लगाम घालण्याची गरज आहे. कारण पुणे परिसरात हळदीवर जेवढा खर्च होतो; तेवढ्या खर्चात नगर, बीडच्या काही भागांत लग्न होतात. यावर निश्चितच आत्मचिंतन व्हावे.
- सचिन राक्षे, प्रगतशील शेतकरी, सांगवडे
ssociated Media Ids : KIW25B04458