64614
पावसकरांच्या कवितेत जीवनाचा आशावाद
मान्यवरांचे गौरवोद्गार ः सावंतवाडीत ‘अनुभूती’ कविता संग्रहाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः डॉ. अमूल पावसकर यांनी आपल्या कविता संग्रहातून अनुभवाची शिदोरी घेऊन आपल्या सर्वव्यापक लेखणीतून काही उद्रेक, काही आशावादी राजकीय, सामाजिक जीवनाच्या कवितांचे यथार्थ दर्शन घडविले. सत्तेसाठी चाललेले राजकारण यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला, असा सूर डॉ. पावसकर यांच्या ‘अनुभूती’ या कविता संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात उपस्थितांनी आळवला.
येथील सर्जन डॉ. अमूल पावसकर यांच्या ‘अनुभूती’ काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवारी (ता. १७) सायंकाळी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात झाले. डॉ. पावसकर यांचा हा चौथा कविता संग्रह असून यात वेगवेगळ्या दर्जेदार २०० कविता आहेत. या प्रकाशन सोहळ्याला कवी अजय कांडर, प्रमुख पाहुणे अनिरुद्ध फडके (मुंबई), डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. हर्षदा देवधर, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, प्रफुल्ल वालावलकर, डॉ. अमूल पावसकर, डॉ. कादंबरी पावसकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. संजय निगुडकर, डॉ. संजय सावंत, डॉ. राजेश नवांगुळ, रणजित देसाई, डॉ. मकरंद परुळेकर, आनंद वैद्य, डॉ. वादिराज सौदत्ती, मंदार परुळेकर, डॉ. वजराटकर, पावसकर कुटुंबीय आदी उपस्थित होते.
कवी कांडर यांनी, हा संग्रह सामाजिक भावनेपासून राजकीय भाष्यही करतो. प्रेमापासून निसर्गापर्यंत बोलतो, मानवी नाती टिकवू पाहतो, असे मत व्यक्त केले. मानवी नातेसंबंध हा डॉ. पावसकरांच्या कवितेचा गाभा आहे. त्यांची प्रत्येक कविता वाचल्यानंतर काहीतरी नवीन शिकायला मिळाले, असे डॉ. संजय सावंत यांनी सांगितले. डॉ. मुक्तानंद गवंडळकर, डॉ. नवांगुळ, डॉ. आंबेरकर, श्री. वालावलकर, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. देवधर, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. निवेदन डॉ. संजीव आकेरकर यांनी केले.
.....................
साहित्यिक मित्रांच्या सहवासातून कवी
कवी डॉ. पावसकर म्हणाले, ‘‘मनात साठलेल्या विचारांना अनुभवांना कवितांच्या रुपाने मोकळी वाट करून देण्याचा हा प्रयत्न आहे. समाजाला काही शिकवण्याचा काही हेतू नाही. लहानपणापासून राष्ट्रसेवा दलाचे संस्कार असल्याने थोडासा समाजवाद, स्वामी स्वरुपानंदांचे अध्यात्मिक अधिष्ठान मनात आहे. साहित्यिक मित्रांचा मिळालेला सहवास, पत्नी डॉ. कादंबरी यांचे समृद्ध वाचन या सर्वातून अनुभव व जाणिवा समृद्ध होत गेल्या आणि त्यातून हा काव्य प्रवास सुरू झाला.’’