उरण, ता. १८ (वार्ताहर) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उरण-करंजा रस्त्याचे काम सुरू आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून कंत्राटदाराने हे काम अर्धवट अवस्थेत सोडल्याने अवकाळी पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे.
चाणजे ग्रामपंचायत हद्दीमधील २५ ते ३० हजार नागरिकांना बाजार व इतर खरेदीसाठी उरणमध्ये यावे लागते. शिवाय, उरण ते अलिबाग जलप्रवासासाठी करंजा-उरण रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यातच करंजा बंदराच्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरून अवजड वाहनांची रेलचेल सुरू आहे. त्यामुळे उरण-करंजा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी अनेक वर्षे दुर्लक्षित होता. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते. अनेक वेळा मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी या रस्त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून निधी मंजूर करून घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या माध्यमातून हा मार्ग बनवण्यास सुरुवात केली; मात्र काही अंतर रस्ता बनविल्यानंतर ठेकेदाराने अर्धवट ठेवला आहे.
---------------------
आठवडाभरात काम पूर्ण करणार!
रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न भेडसावत आहे. काही महिन्यांपूर्वी याच खड्ड्यामुळे एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. आता अवकाळी पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून आणखी जीव जाण्याची वाट ठेकेदार पाहत आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. राहिलेला २०० मीटरचा रस्ता काँक्रीटीकरणाचा असल्याने तो शिल्लक राहिला आहे. येत्या आठवड्यात हा रस्ता ठेकेदाराकडून पूर्ण केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांनी दिली.