नैसर्गिक शेती अभियानासाठी २६०० हेक्टर क्षेत्र निश्चित
esakal May 19, 2025 03:45 AM

नैसर्गिक शेती मिशनसाठी
२६०० हेक्टर क्षेत्र निश्चित
कृषि विभाग ; जिल्ह्यातील ६५०० शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील २६०० हेक्टर पिकाखाली आणण्यासाठी ६५०० शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान कृषि विभागाकडून राबविण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ५२ शेतकरी गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटात १२५ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विषमुक्त शेतमाल उत्पादन या उद्देश्याने नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विभाग व ''आत्मा'' यांच्या प्रयत्नातून नैसर्गिक शेती अभियान राबविताना विषमुक्त अन्नधान्य उत्पन्नावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. रासायनिक खताचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात येत नैसर्गिक शेतीवर भर देण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टप्प्या-टप्प्याने शेतकरी सहभाग वाढवत नेत अधिकाधिक क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शाश्वत शेतीला चालना देणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे जैवविविधतेला प्रोत्साहन देणे या उद्देश्याने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. नैसर्गिक घटकाचा वापर करून विषमुक्त शेतमाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी स्वतःहून तयार होत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.