64617
वीज कंत्राटी कामगार
लवकरच सेवेत कायम
आनंद लाड ः संघटनेच्या लढ्याला यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः कित्येक वर्षांच्या लढ्याला आता यश आले असून वीज कंत्राटी कामगारांना केवळ कायम होण्याची प्रतीक्षाच राहिली आहे. हा निर्णय लवकरच लागणार आहे, असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी पत्रकात म्हटले आहे. पत्रकात म्हटले आहे की, २०१२ मध्ये महावितरण कंपनीत ७००० विद्युत सहाय्यक पदाची भरती निघाली होती. या भरतीमध्ये सर्व कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना त्याच पदावर सेवेत कायम करून घ्यावे, अशी याचिका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. राज्यभरातील १३६२ कामगार यात समाविष्ट आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही केस १३ वर्षे ठाणे औद्योगिक न्यायालयात चालली. या केसचा अंतिम निकाल हा १० जूनला लागणार असल्याने वीज कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई यांचे संघटनेला मार्गदर्शन लाभले. संघटनेच्यावतीने अॅड. विजय वैद्य यांनी १३ वर्षे कोर्टात बाजू मांडली, अशी माहिती श्री. लाड यांनी दिली.