राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सक्रीय झाला असून येत्या काही दिवस हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-कोमोरिन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटे आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मान्सूनने प्रवेश केला आहे. या प्रभावामुळे राज्यभर ढगाळ हवामान, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवार (ता. २०) आणि बुधवार (ता. २१) रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन दिवसांसाठी संपूर्ण राज्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असल्यामुळे तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान ४३ अंशांवरून थेट ३५ अंशांपर्यंत घसरले आहे. दिवसाढवळ्या ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उकाड्यातून काहीसा दिलासा मिळत आहे.
कोकणात सोमवार (ता. १९) आणि मंगळवारी (ता. २०), तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मंगळवार व बुधवार (ता. २१) रोजी काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असून, कोकणात रविवारी (ता. १८) तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विशेषतः पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, धुळे, नाशिक आणि त्यांच्या संबंधित घाट भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाऱ्याच्या झंझावातासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
याशिवाय, नंदुरबार आणि जळगाव वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता. १९); तर पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, जालना, हिंगोली आणि नांदेड वगळता संपूर्ण राज्यात सोमवारी (ता. २०) देखील मेघगर्जनेसह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.