टीम इंडिया जून महिन्यात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पपियनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिली मालिका असणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा व्हायची आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
उभयसंघातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या 2 डेटा एनालिस्ट यांना पदमुक्त केलं आहे. डेटा एनालिस्ट फ्रेडी वाईल्ड आणि नॅथन लेम या दोघांना हटवलं आहे. खेळाडूंनी आकड्यांऐवजी अनुभव आणि अंतर्मनावर अधिक विश्वास ठेवायला हवा, असं हेड कोच ब्रँडन मॅक्युलम याचं म्हणणं आहे.
द डेली टेलीग्राफच्या वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट टीम आता डेटा अॅनालिटिक्सचा वापर कमी करणार असल्याचं स्पष्ट होतं आहे. रिपोर्ट्सनुसार, आता सिनिअर डेटा अॅनालिस्ट नॅथन लेमन आणि फ्रेडी वाईल्ड (व्हाईट बॉल अॅनालिस्ट) हे दोघेही इंग्लंडचा भाग नसणार. लेमन आणि वाईल्ड हे दोघेही या महिन्याच्या शेवटी विंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी 20I मालिकेसाठी टीमसह नसणार. याच मालिकेतून हॅरी ब्रूक कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे.
“टी 20 क्रिकेटसाठी डेटा-आधारित रणनीती प्रभावी ठरू शकते. मात्र खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांच्या खेळाच्या जाणिवेनुसार आणि मैदानावरील अनुभवानुसार निर्णय घ्यावेत”, असं ब्रँडन मॅक्युलम याने स्पष्ट केलं.
तसेच सपोर्ट स्टाफची संख्या मर्यादित ठेवल्यानं ड्रेसिंग रूममधील वातावरण अधिक आरामदायक होतं. तसेच इंग्लंडमध्ये आता खेळाडूंना वैयक्तिक पातळीवर डेटा अॅनालिस्टकडून सल्ला घेण्याची परवानगी असेल. मात्र सांघिक पातळीवर परिस्थितीनुसार आणि अनुभवाला प्राधान्य दिलं जाईल”, असंही ब्रँडन मॅक्युलम याने स्पष्ट केलं. त्यामुळे इंग्लंडचा हा निर्णय टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेत किती प्रभावी ठरणार? हे देखील लवकरच स्पष्ट होईल.