नुकसान होऊनही पालमंत्र्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष
नागरिकांमध्ये संतापाची लाट; ७६७ घरांचे नुकसान
पालघर, ता. १८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी अवकाळी पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. यामध्ये नागरिकांना बेघर होण्याची वेळही आली. मच्छीमार, शेतकरी, वीटभट्टीवाल्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना १८ ते २० तास अंधारात काढावे लागले. दरम्यान, पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला मदत पुरवण्याचे निर्देश न देता व नुकसानग्रस्तांना भेट देणे गरजेचे असताना ते जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. दुसरीकडे तिरंगा रॅलीसाठी खास पालघरमध्ये येऊन रॅलीमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या कृतीविषयी जिल्हावासीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे सरकारी आकड्यानुसार ७६७ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये वाढ होऊन तो आकडा हजारपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या वेळी विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर धाकटी डहाणू येथे ५० बोटींचे नुकसान झाले आहे.
-----------------
वाढवणचा उदो उदो
जिल्ह्यातील इतर ठिकाणी मच्छीमारांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मच्छीमारांच्या नुकसानीचा आकडा साधारण दोन कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यातच वाढवणचा उदो उदो होत असतानाच दुसरीकडे मात्र मच्छीमारांना मदत न मिळाल्यामुळे पालकमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
---------------------------
मोखाडा, जव्हार, तलासरी, पालघर, वसई या तालुक्यांत अनेक ठिकाणी घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आपलं विरार बिराड अंगणात ठेवून ही कामे सुरू आहेत. दोन दिवसांच्या पावसाने घराबाहेर ठेवलेले अन्नधान्य भिजून गेले आहे. घराच्या बांधकामासाठी आणलेले सिमेंटही खराब झाले आहे. पुढील १५ ते २० दिवसांत त्यांची ही कामे पूर्ण झाली नाहीत तर त्यांनी राहायचे कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे पालकमंत्र्यांनी येऊन त्यांना धीर देणे अपेक्षित होते; मात्र पालकमंत्र्यांनी या साऱ्या परिस्थितीकडे डोळेझाक करून प्रशासनाला फक्त निर्देश दिल्याने पालकमंत्र्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
------------------
प्रतिक्रिया
संतापाची गरज नाही. ज्या दिवशी घटना घडली त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मी निर्देश दिले आहेत. ज्या ग्रामीण भागात घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना पत्रे देण्याच्याही सूचना दिल्या आहेत. ज्या कोळी बांधवांच्या बोटी नादुरुस्त झाल्या त्यांचे प्रथम पंचनामे पूर्ण करा. त्यांना मदत देण्याचेही आदेश दिले आहेत. भविष्यकाळात सगळी यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवली असून, गरज पडली तर सीएसआरमधून आपण फंड देऊ, अशा प्रकारे जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांना सांगितले आहे, असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.