आयपीएलच्या 18 व्या मोसमात अखेर 60 सामन्यानंतर प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले. गुजरातने रविवारी दिल्ली कॅपिट्ल्सवर 10 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातने या विजयासह प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स या 2 संघांनीही प्लेऑफचं तिकीट मिळवलं. त्यामुळे आता एका जागेसाठी 3 संघांमध्ये थेट लढत आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. या तिन्ही संघांसाठी उर्वरित प्रत्येक सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे एक चूक प्लेऑफचं स्वप्न भंग करु शकते.
या 18 व्या हंगामात सोमवारी 19 मे रोजी लखनौ सुपर जायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. लखनौ आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा या मोसमातील प्रत्येकी 12 वा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी लखनौने 27 मार्च रोजी हैदराबादवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे हैदराबादकडे या पराभवाचा हिशोब करण्यासह लखनौला बाहेर करण्याची संधी आहे. हैदराबाद या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहे. त्यामुळे हैदराबाद हा सामना जिंकून लखनौचा गेम ओव्हर करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंत याच्या कॅप्टन्सीत 11 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 6 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. लखनौ 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. तर हैदराबादला 11 पैकी फक्त 3 वेळा विजयी होता आलंय. हैदराबादच्या खात्यात 6 गुण आहेत. हैदराबादचा आता या मोहिमेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे.
लखनौ विरुद्ध हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. त्याआधी 7 वाजता टॉस होईल. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.
दरम्यान आकडेवारी पाहता लखनौ हैदराबादवर वरचढ राहिल्याचं स्पष्ट होतं. लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळवण्यात आले आहेत. लखनौने यापैकी सर्वाधिक 4 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला केवळ 1 सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे उभयसंघातील सहाव्या सामन्यात कोण मैदान मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.