भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मात्र त्यानंतर पाकिस्तानने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. मात्र या सर्व प्रकरणानंतर दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडले आहेत. अशात पाकिस्तानची खोड जिरवण्यासाठी बीसीसीआयने या आशिया कप 2025 स्पर्धेत इंडिया वूमन्स आणि मेन्स टीम सहभागी होणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र याबाबत बीसीसीआय सचिव दैवजित सैकीया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सर्व चित्र स्पष्ट झालं आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणलेले आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट टीम आयसीसीनंतर आशिया कप स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात. मात्र दोन्ही देशातील तणावानंतर बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचा दावा, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला. बीसीसीआयने याबाबत एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेला सांगितल्याचाही दावा केला गेला. मात्र आता बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
बीसीसीआयने आशिया कप 2025 बाबतच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. बीसीसीआय सचिव दैवजित सैकीया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. सध्या आशिया कप स्पर्धेबाबत एसीसीसह काहीही बोलणं न झाल्याचं सैकीया यांनी सांगितंल.
“आज सकाळपासून एसीसीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या आशिया कप आणि एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत सहभागी न होण्याबाबत बीसीसीआयच्या निर्णयाबद्दलचे वृत्त पाहिलं. या अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. कारण आतापर्यंत बीसीसीआयने एसीसीच्या आगामी स्पर्धेबाबत चर्चासुद्धा केलेली नाही. तसेच असा कोणताही निर्णय घेतलेला नाही”, असं सैकीया यांनी स्पष्ट केलं.
‘सध्या आमचे लक्ष हे आयपीएल 2025 आणि त्यानंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यात मेन्स आणि वूमन्स टीम जाणार आहेत. आशिया कप किंवा इतर कोणत्याही एसीसी स्पर्धेचा मुद्दा कोणत्याही स्तरावर चर्चेसाठी आलेला नाही. तसेच एसीसी संबंधित स्पर्धेबाबत कोणताही निर्णय होईल त्याबाबत माध्यामांद्वारे माहिती दिली जाईल”, असंही सैकीया यांनी नमूद केलं.
बीसीसीआय सचिवांची प्रतिक्रिया
दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेचं आयोजन हे सप्टेंबर मध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. तसेच गेल्या वेळेस पाकिस्ताकडे स्पर्धेचं यजमानपद होतं. त्यामुळे टीम इंडियाने आपले सर्व सामने हे श्रीलंकेत खेळले होते. टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर मात करत आशिया कपवर नाव कोरलं होतं.