मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अल्पावधीतच घराघरात पोहोचली. योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होत आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात जमा झाला असला, तरी मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी प्रतिक्षेत आहेत. राज्य सरकारने १५०० रुपयांचा हप्ता वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याची अमंलबजावणी झाली नाही. यावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
डॉ. गोऱ्हे या सध्या दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर असून, व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात त्यांनी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी आणि लाभार्थी महिलांशी संवाद साधला.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, "योजनेच्या लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे. सरकारी निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. त्यामुळे प्रामाणिक लाभार्थींनी घाबरण्याची गरज नाही.", असं गोऱ्हे म्हणाल्या.
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, " लवकरच योग्य वेळी १५०० रुपयांची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचा निर्णय घेईल." महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितलं. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून महिलांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही जाहीर केले.