भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो भारताच्या कसोटी संघाचा कर्णधारही होता. पण आता त्याच्या निवृत्तीनंतर भारताचा पुढचा कसोटी कर्णधार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये शुभमन गिलचे नाव आघाडीवर आहे.
सध्या भारताचा कसोटी कर्णधार बनवले जाण्याची चर्चा जोरदार सुरू आहे. याबाबत अनेकांनी प्रतिक्रियाही दिली आहे. काहींच्या मते हा योग्य निर्णय आहे, तर काहींच्या मते हा निर्णय चुकीचा आहे.
पण आता यावर गिल आयपीएलमध्ये कर्णधार असलेल्या सहाय्यक प्रशिक्षक आशिष कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना त्याला एमएस धोनीचा संदर्भही जोडला आहे.
नुकतेच गुजरात टायटन्सने त्याच्या नेतृत्वात रविवारी (१८ मे) दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यानंतर आशिष कपूर यांनी पत्रकार परिषदेत गिलच्या परिपक्वतेवर भाष्य केले. तो त्याची वैयक्तिक कामगिरी आणि संघाची रणनीती यांच्यात योग्य समतोल साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
कपूर म्हणाले, 'जेव्हा धोनीला वर्ल्ड कपसाठी (२००७ टी२० वर्ल्ड कप) पहिल्यांदा कर्णधार करण्यात आले होते, तेव्हा त्याने कुठेही नेतृत्व केले नव्हते. त्यावेळी कोणालाही माहित नव्हते की १०-१२ वर्षांनी तो जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असेल.'
'जर तुम्ही कोणाला त्यावेळी याबद्दल विचारले असते, अगदी धोनीलाही विचारले असते की तुला तुझ्या नेतृत्वाबद्दल काय वाटते? तर काहीच उत्तर आले नसते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीबद्दल निर्णय देण्यापूर्वी काही काळ त्या व्यक्तीला तुम्हाला पाहावे लागले. आणि अजून तर त्याने सुरुवातही केलेली नाही.'
याशिवाय कपूर यांनी असंही म्हटलं की तो त्याच्या खेळाला चांगलं ओळखतो. त्यांनी म्हटलं, 'मी त्याला १६ वर्षांखाल खेळताना पासून पाहात आहे. खरंतर आम्ही त्याच्यासोबत एनसीएमध्ये दोन शिबिरंही केली आहेत. तेव्हा देखील तो त्याच्या वयाच्या खेळाडूंपेक्षा त्याचं डोकं अधिक वापरायचा. आणि हे कर्णधारासाठी महत्त्वाचे कौशल्य आहे. फक्त तुमच्यापुरता विचार न करता इतर १० खेळाडूंचा विचार करणे आणि सामना कसा जिंकू शकतो, याची योजना आखणे महत्त्वाचे असते.'
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाला जूनमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. त्यासाठी येत्या काही दिवसात भारतीय संघाची निवड होऊ शकते. यावेळी नव्या कर्णधाराची घोषणाही होण्याची शक्यता आहे.
गुजरात टायटन्सबद्दल सांगायचे झाले, तर त्यांनी १२ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले आणि ३ पराभव स्वीकारले आहेत. त्यामुळे सध्या १८ गुणांसह ते पहिल्या क्रमांकावर आहेत.