पिंपरी, ता. १९ : ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘हिंदुस्थान झिंदाबाद आदी घोषणा, हातात तिरंगा ध्वज. देशभक्तिपर गीत. लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने तिरंगा यात्रेचे आयोजन पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आले होते. चिंचवड स्टेशन येथून सुरू झालेल्या या यात्रेचा पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समारोप झाला.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेनेने जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदींसह पिंपरी-चिंचवड शहरातील माजी सैनिक, राजकीय पदाधिकारी, बजरंग दलाचे पदाधिकारी, सामाजिक संघटना आणि हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून या भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. प्रसंगी, माजी सैनिक व अधिकारी आणि हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांवर भ्याड हल्ला केला. अनेक भारतीय सर्वसामान्य नागरिकांचा त्यामध्ये बळी गेला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारतातील माता-भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे. भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भारतीय सेना के सन्मान में, हर पिंपरी चिंचवडकर मैदान में या यात्रेचे आयोजन करण्यात आले.
चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, वासुदेव बळवंत फडके स्मारकापासून पदयात्रेला सुरूवात झाली. महावीर चौक, मोरवाडी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे यात्रेचा समारोप झाला. दरम्यान देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.