उज्ज्वलकुमार
पटणा : बिहारमध्ये राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत असलेले निवडणूक रणनीतीकार आणि ‘जन सुराज’या पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना आज राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गावात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.
प्रशांत किशोर यांनी नालंदा जिल्ह्यातील नितीश कुमार यांचे मूळ गाव कल्याणबिघा येथून आजपासून एक हस्ताक्षर मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती. या मोहिमेअंतर्गत शासकीय कामांमधील भ्रष्टाचार आणि गरिबांना मिळणाऱ्या योजनांबाबत जनतेची मते जाणून घेण्याचा हेतू आहे, असा दावा किशोर यांनी केला होता.
त्यानुसार आज ते कल्याणबिघाकडे रवाना झाले असता गावाच्या सीमेवरच त्यांना अडविण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. किशोर यांना गावात जाण्यास मज्जाव करण्यात आल्यानंतर गावातील त्यांचे समर्थक किशोर यांच्या ताफ्याजवळ जमा झाले. यावेळी उपस्थितांशी बोलताना किशोर यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली.