स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिने खूप महत्वाची असतात. स्नायूंना अधिक बळकटी देण्यासाठी आणि मसल गेनसाठी शरीराला प्रथिनांची अर्थात प्रोटीन्सची आवश्यकता असते. म्हणूनच बरेच लोक त्यांच्या आहारात प्रोटीन पावडरचा समावेश करतात. अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर बाजारात सहज उपलब्ध असतात, परंतु त्या खूप महाग असतात आणि अशा पावडर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत की नाही याची खात्री देखील नसते. यावरचा सोपा उपाय म्हणजे घरच्या घरीच प्रोटीन पावडर तयार करणे. जर तुम्हाला प्रोटीन पावडर घ्यायची असेल तर तुम्ही काही बिया आणि ड्रायफ्रूट्सच्या मदतीने घरीच प्रोटीन पावडर देखील बनवू शकता. ती घरी बनवलेली असल्याने शुद्ध, स्वस्त आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
प्रथिनांसोबतच, या घरगुती प्रोटीन पावडरमध्ये हेल्दी फॅट्स, फायबर, विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. ही प्रोटीन पावडर वर्कआउट दरम्यान किंवा सकाळच्या न्याहारीसाठी परफेक्ट आहे. जर तुम्हालाही ही खास घरगुती प्रोटीन पावडर स्वतःसाठी बनवायची असेल, तर ती बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.
मखाना – 1 कप
अळशीच्या बिया – 1/2 कप
बदाम – 20
हरभरा – 1 कप
काजू – 15
भोपळ्याच्या बिया – 1/2 कप
पिस्ता – 20
सर्वप्रथम, एका पॅनमध्ये थोडे तूप घ्या आणि त्यात सर्व ड्रायफ्रूट्स आणि बिया घालून नीट परतून घ्या.
लक्षात ठेवा की गॅस मंद आचेवर असावा. ड्रायफ्रूट्स आणि बिया हलके तळून घ्या.
यानंतर, हे सगळे जिन्नस एका प्लेटमध्ये काढा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
सर्व पदार्थ थोडे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा.
ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा.
डबा कोरडा आहे याची खात्री करा आणि तो घट्ट बंद करा जेणेकरून हवा आत जाणार नाही.
अशाप्रकारे प्रोटीन पावडर तयार आहे. तुम्ही दररोज एक चमचा दुधात मिसळून ती पिऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्याला कोणताही त्रास होणार नाही आणि शरीराला आवश्यक प्रमाणात प्रथिने देखील मिळतील.
हे विशेषतः स्नायूंच्या वाढीस उपयुक्त ठरू शकते . डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही ते दुधात मिसळून मुलांना देखील देऊ शकता.
हेही वाचा : Fashion Tips : लेटेस्ट रिंग्स डिझाइन्सने मिळवा शाही लूक
संपादित – तनवी गुडे