कोविड आला, मास्क घाला; मुंबईत 53 रुग्ण, महापालिका अलर्ट! सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयांत 112 खाटा राखीव!!
Marathi May 20, 2025 09:24 AM

चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि काही देशांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईतही मे महिन्यापासून रुग्णसंख्या वाढल्याने टेन्शन वाढले आहे. रविवारी केईएम रुग्णालयात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर मुंबईभरात 53 रुग्ण असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केल्यामुळे पालिका ‘अलर्ट’ झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास सुविधेसाठी अंधेरीच्या सेव्हन हिल्स आणि चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात 112 बेड तैनात करण्यात आले आहेत. तर लक्षणे असल्यास आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, स्वतःला इतरांपासून दूर ठेवा अशी नियमावलीच पालिकेने आज जाहीर केली आहे.

मुंबईमध्ये मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आलेल्या तीन लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला, तर लाखो जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे मुंबईत रुग्णवाढ झाल्यास खबरदारी घेण्यासाठी पालिकेने नियमावली जाहीर केली आहे. शिवाय नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सोय आणि मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय रुग्णालये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडसह सज्ज ठेवण्यात आली आहेत.

अशी आहे नियमावली

  • लक्षणे असल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे.
  • इतरांपासून अंतर राखणे,
  • साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे,
  • योग्य आहार व आराम करणे.

यांना धोका जास्त!

कर्करोग, वृद्ध नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृताचा आजार असल्यास संबंधित रुग्णाला कोरोनाचा धोका सर्वाधिक असतो. अशा सहव्याधी असणाऱ्या व्यक्तीनी विशेष काळजी घ्यावी.

अशी आहेत कोविडची लक्षणे

  • ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.
  • यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

ही लक्षणे व्यक्तीनुसार बदलू शकतात. तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे.

रुग्णालयांतील बेड सज्जता

सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये मुले आणि गरोदर स्त्रीयांसाठी प्रत्येकी 20 बेड आणि 60 सामान्य बेड तैनात ठेवले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात 2 आयसीयू बेड व 10 बेडचा वॉर्ड उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास या खाटा वाढवण्यात येणार आहेत.

कोविडबद्दल सरकारने भूमिका स्पष्ट करावी!

कोरोनाचा वेगळा स्ट्रेन आला आहे का, कुठेही भीती न निर्माण करता आपण काय करू शकतो यावर राज्य सरकारने आता बोलणे अपेक्षित आहे, सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर चर्चा झाली पाहिजे. आकडेवारी कुठेही आलेली नाही. आकडेवारी जाहीर करून लोकांशी संवाद साधला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

स्वतःहून औषधे घेऊ नका; डॉक्टरांचा सल्ला घ्या!

कोविडसंबंधित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित महानगरपालिकेच्या दवाखाना, रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. स्वतःहून औषधे घेऊ नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. केमिस्टनाही कोरोनाची औषधे प्रिस्क्रीप्शनशिवाय न देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

स्क्लेसेस आहेत

नुकतीच ‘बिग बॉस 18’ मध्ये झळकलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सोशल मीडियावर तिने माहिती दिली. पोस्टमध्ये तिने लिहिलेय, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा आणि मास्क घालायला विसरू नका.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.