ढिंग टांग
भ्रमण मंडळाचे सर्वपक्षीय सदस्य आणि सहप्रवाश्यांस, भारत माता की जय!
रणांगणात पाकिस्तानची आपल्या लष्कराने चांगलीच जिरवली. उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये पाकिस्तानात बऱ्याच ठिकाणी पिवळा रंग पसरल्याचे दिसून येत असून हे नेमके काय झाले आहे, याचा शोध घेतला जात आहे. तथापि, इतके होऊनही पाकिस्तानची खुमखुमी अजून पुरती जिरली नसल्याने त्यांना संपूर्ण नेस्तनाबूत करण्यासाठी जगभर शिष्टमंडळे पाठवून भारताची भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय आदरणीय मोदीजींनी घेतला आहे. ही शिष्टमंडळे सर्वपक्षीय आहेत. युद्धप्रसंगी आपण सारे एक आहोत, हे जगाला दाखवून द्यावे.
परदेश दौऱ्यांवर रवाना होणाऱ्या सर्वपक्षीय भ्रमणमंडळाच्या मेंबरांसाठी खालीलप्रमाणे सूचना जारी करीत आहोत. त्यांचे तंतोतंत पालन होणे अपेक्षित आहे.
१. काही शिष्टमंडळे अमेरिकेत जातील, काही युरोपात. काही आखाती देशांतही जाणार आहेत. तथापि, ज्याची जिथे नियुक्ती झाली आहे, तिथेच जावे लागेल. तिकिट अहस्तांतरीय आहे. ‘अमेरिकेत मी गेल्या वर्षीच गेलो होतो, आमचा जपान ऱ्हायलाय’ अशा विनंत्या करु नयेत. मान्य होणार नाहीत.
२. ऐनवेळी युरोपच्या विमानात घुसण्याच्या इराद्याने गरम कपडे घेऊन विमानतळावर जाल, आणि विमान आखाती देशात उतरेल! वाळवंटात गरम कपडे घालून फिराल तर शिजून निघाल!!
३. दक्षिण आफ्रिका आणि केनियाला जाऊन पाकिस्तानच्या कुटिल कारवायांचा भंडाफोड करावा. तिथे गेल्यावर चित्ते, जिराफ, झेब्रे बघायला जाऊ नये!
४. हा राजनैतिक परदेश दौरा आहे, आपल्याला सरहद्दीवर जायचे नाही!! शशी थरुर नामक एका भ्रमण मंडळ सदस्याने ‘हेल्मेट घ्यावे का’ अशी क्वेरी काढली आहे, म्हणून हा खुलासा! (सदरील सन्माननीय सदस्यास स्वदेशातच त्यांच्याच पक्षाच्या बैठकीत हेल्मेटची गरज भासेल! तेथे त्यांनी वापरावे.)
५. भ्रमणमंडळातील मेंबरांनी आपली जाण्याची तारीख शक्यतो जाहीर करू नये. अचानक निघून जावे. बरेच जण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गपचूप परदेशात सटकतात. तसेच जावे, त्यामुळे गोपनीयता अबाधित राहील.
६. दौऱ्यावर असताना सोशल मीडियावर निसर्गशोभा, ऐतिहासिक स्मारक, पुतळे, बगिचे यांच्या पार्श्वभूमीसह रिल्स, फोटो टाकू नयेत. त्यामुळे भ्रमण मंडळाच्या दौऱ्याच्या हेतूचे गांभीर्य जाते!
७. चेहरा होताहोईतो गंभीर ठेवावा. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी (दोन्ही तसे एकच आहेत…) यांचे कारनामे जगासमोर आणावेत. यजमान देशातील लोक शिष्टाचारादाखल ‘जेवून जा’ अगर ‘चहा घ्या’ असे म्हणतील. लगेच ‘हो’ म्हणून टेबलाशी जुळणे बरे दिसणार नाही. ‘भूक नाही’ एवढे सांगून नमस्कार करुन पुढील देशाकडे निघावे.
८. ज्या मेंबरांची भ्रमण मंडळात निवड झाली त्यांनी फार आनंद दाखवू नये. कारण अनेक मेंबरांची निवड झालेली नाही! सबब, स्वपक्षातच वखारी पेटल्याचा अनुभव काही जणांना येईल. परंतु, देशासाठी एवढे सहन करावे.
९. सर्व पक्षांतील निवडक मेंबरे निवडण्यात आली आहेत. पक्षांकडून नावे मागवण्याची औपचारिकता हे केवळ सौजन्य होते. ही निवड स्वत: मा. मोदीजींनी केलेली आहे. कळलं ना? हांऽऽ!!
आणि फायनल-
१०. भ्रमण मंडळातील मेंबरांची निवड बघा. ज्यांना इंग्रजी भाषेत बोलता येते, त्यांचीच निवड झालेली आहे, असे दिसेल! ज्यांना या मंडळात आपली निवड झाली नाही, याबद्दल वैषम्य वाटत असल्यास त्यांनी आत्ताच फाडफाड इंग्रजीचा कोर्स जॉइन करावा. पुढील वेळेस विचार करणेत येईल.