Rice Production : देशात यंदा तांदळाचे उत्पन्न १२ कोटी टन, निर्यातही वाढली उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा
esakal May 20, 2025 12:45 PM

पुणे : यंदा देशात तांदळाचे विक्रमी १२ कोटी टन उत्पादन निघाले आहे. तसेच, उन्हाळी पीक जर यामध्ये जोडले, तर साधारण १३ कोटी ६४ लाख टन यावर्षी देशाचे उत्पादन झाले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

देशात तांदळाच्या उत्पादनात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी जून २०२४ पासून टप्प्याटप्प्याने उठविण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये शेला बासमती प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीस मंजुरी देण्यात आली. त्यानंतर व्हाइट बिगर बासमती तांदळाचीही निर्यात सुरू करण्यात आल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.

कमी दरातील बिगर बासमती आणि बिगर बासमती तुकडा तांदळाच्या निर्यातीवर मात्र अद्याप बंदी कायम ठेवण्यात आली आहे. देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहावा आणि स्थानिक बाजारात भाववाढ होऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून, तो योग्यच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर पूर्वी लावण्यात आलेली २० टक्के निर्यात शुल्क (ड्यूटी) सप्टेंबर २०२४ मध्ये रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे भारतीय तांदळाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक किमत मिळाली आणि निर्यातीला चालना मिळाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

१३७ लाख टन विक्रमी निर्यात

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताने बिगर बासमती तांदळाची एकूण १३७ लाख टन इतकी विक्रमी निर्यात केली आहे. यामध्ये ९० लाख टन शेला बासमती, ३३ लाख टन व्हाइट राइस आणि १४ लाख टन इतर बिगर बासमती तांदळाचा समावेश आहे. तसेच, बासमती तांदळाची निर्यात वाढून ५९ लाख टनांवर पोहोचली आहे, जी मागील वर्षी ५३ लाख टन होती. या संपूर्ण निर्यातीमधून भारताला एकूण १२ हजार दशलक्ष डॉलर इतके परकी चलन मिळाले आहे. त्यात बिगर बासमती तांदळामधून ६,१५० दशलक्ष डॉलर, तर बासमती तांदळामधून ५,८५० दशलक्ष डॉलर इतके उत्पन्न झाले आहे.

शेतकऱ्यांना फायदा

या निर्यातीमुळे देशातील अनेक तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. आंबेमोहोर, इंद्रायणी, कोलम यांसारख्या बिगर बासमती तांदळाच्या प्रकारांना चांगले दर मिळाले असून, स्थानिक बाजारातही याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

तांदळाची निर्यात गेल्या १५ वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. २०११ मध्ये प्रथमच बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला परवानगी मिळाली. त्यानंतर यामध्ये वाढ होत आहे. सरकारने योग्यवेळी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली. यामुळे भारताच्या जागतिक बाजारपेठेतील स्थिती बळकट झाली असून, शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे.

डॉ. राजेश शहा, जयराज ग्रुपचे संचालक व तांदळाचे व्यापारी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.