नाशिक- गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावर टवाळ्या करणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद देणे सुरू केले आहे. त्यामुळे गंगापूर रोड, कॉलेज रोडसह परिसरातील गल्लीबोळात टवाळ्या करणाऱ्याचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी दोन दिवसात सुमारे सव्वाशे टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयुक्तालय हद्दीतील ‘स्ट्रीट क्राईम’ नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी धडक कारवाई करण्याचे आदेश केले आहेत.
त्यानुसार शहर पोलिसांनी टवाळखोरांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर प्रतिबंधात्मक कारवाई करताना गेल्या चार महिन्यात सुमारे अडीच ते तीन हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
त्यानुसार, गंगापूर ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर रोड, कॉलेज रोड, महात्मानगर रोडसह परिसरात पोलिसांनी दिवसा-रात्री टवाळ्या करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. गल्ली-बोळातील टपऱ्या, मोकळे मैदानांवर कट्टे बनविणार्याना दंडुक्यचा प्रसाद देत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
ब्लॅकस्पॉट कळवा...
शहरातील मोकळे मैदाने, टपर्यांबाहेर टोळक्याने थांबून टवाळके करणाऱ्या ठिकाणांची माहिती नागरिकांनी थेट पोलिस आयुक्तालयाच्या हेल्पलाइन क्रमांक ९९२३३२३३११ यावर कळवावी, असे आवाहन शहर आयुक्तालयाने केले आहे.