सावंतवाडी येथे पत्रकारांची
शुक्रवारी आरोग्य चिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब सावंतवाडी यांच्यावतीने तसेच एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर शुक्रवारी (ता. २३) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत साधले मेस समोरील रोटरी क्लब हॉल, सावंतवाडी येथे होणार आहे. या शिबिरात एस.एस.पी.एम. हॉस्पिटलमधील नामांकित वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ तथा त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुधीर सांभारे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या जगताप तसेच किडनी विकार तज्ज्ञ डॉ. प्रकाश घोगळे यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथकही शिबिरात सेवा देणार आहे. या आरोग्य शिबिरात सहभागी होणाऱ्यांना सामान्य तपासणी, रक्तदाब मोजणी, ईसीजी तपासणी यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. हिंद लॅबच्या माध्यमातून रक्त तपासणीची सुविधाही पुरवण्यात येणार आहे, ज्यामुळे विविध आजारांचे निदान वेळेत होण्यास मदत होईल. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.