65098
हक्क, अधिकारांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ
न्यायाधीश जे. एम. मेस्त्री ः सावंतवाडीत बंदिवानांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः हक्क आणि अधिकार यापेक्षा कर्तव्ये श्रेष्ठ असतात, असे प्रतिपादन सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश जे. एम. मेस्त्री यांनी केले. येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदिवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या.
सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात बंदिवानांना त्यांचे हक्क, कर्तव्ये आणि कायदेविषयक सहाय्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरास दिवाणी न्यायाधीश मेस्त्री यांच्यासह जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सतीश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे, सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्या आर्या अडुळकर, कारागृह हवालदार अर्जुन घोडके, संदीप शेटे, सुभेदार महादेव गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिवाणी न्यायाधीश मेस्त्री यांनी बंदिवानांना कायदेविषयक सहाय्य आणि सल्ला याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे बंदिवानांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची आणि त्यांना उपलब्ध असलेल्या सहाय्याची माहिती मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनी केले. आर्या अडुळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कारागृह अधीक्षक कांबळे यांनी सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहातील न्यायालयीन बंदिवानांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित केल्याबद्दल सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे आभार मानले. या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरामुळे बंदिवानांना त्यांच्या कायदेशीर बाबी समजावून घेण्यास आणि आवश्यक कायदेशीर मदत मिळण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, यामुळे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जात आहे.